जळगाव । उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या ‘जिमखाना डे’ चे आयोजन 17 मार्च रोजी करण्यात आले असून महाराष्ट्र केसरी पुरस्कार विजेते कुस्तीपटू विजय चौधरी यांच्या हस्ते खेळाडूंचा सत्कार यावेळी केला जाणार आहे. विद्यापीठाच्या अधिसभा सभागृहात हा कार्यक्रम होणार आहे. सलग तीन वेळा महाराष्ट्र केसरी पुरस्कार प्राप्त केलेले कुस्तीपटू विजय चौधरी हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार असून कुलगुरु प्रा.पी.पी.पाटील अध्यक्षस्थानी राहतील. प्रभारी कुलसचिव प्रा.ए.बी.चौधरी, प्रा.पी.पी.माहुलीकर हे देखील यावेळी उपस्थित राहणार आहेत. शौक्षणिक वर्ष 2015-16 व 2016-17 मध्ये आंतरमहाविद्यालयीन, आंतरविभागीय व आंतरविद्यापीठ स्पर्धांमध्ये प्राविण्य प्राप्त केलेल्या खेळाडूंचा सत्कार केला जाणार आहे.
कार्यक्रमात विजेते खेळाडूंचा होणार सत्कार
यावेळी 2015-16 मधील मौदानी स्पर्धेत पारितोषिक प्राप्त केलेल्या जयेश चौधरी, निलेश पाटील, देवाशिष गोस्वामी, भावना पाटील यांचा तसेच पंजाब विद्यापीठ येथे मल्लखांब स्पर्धेत सुवर्णपदक प्राप्त केलेल्या अरविंद जावळे, सचिन चौधरी, कार्तीक दळवी, तुषारी घुगरे, प्रफुल्ल जगताप यांचा सत्कार केला जाईल. अमृतसर येथे तायक्वोंदो स्पर्धेत कास्यपदक विजेता सुधांशु भावसार, भारोत्तोलन स्पर्धेतील कास्यपदक विजेता तुषार सपकाळे यांचा सत्कार केला जाईल. उमविचा सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून अरविंद जावळे (राणी लक्ष्मीबाई महाविद्यालय, पारोळा) याची निवड करण्यात आली आहे. अखिल भारतीय आंतरविद्यापीठ क्रीडा स्पर्धेतील उमेश कोळी, भोलेनाथ चौधरी या रौप्य व कास्यपदक विजेत्या तसेच मौदानी स्पर्धेतील रौप्य पदक विजेता निलेश पाटील याचाही सत्कार केला जाणार आहे. सन 2016-17 साठी उमेश कोळी (धनाजी नाना महाविद्यालय, फैजपूर) याची सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून निवड करण्यात आली आहे, अशी माहिती क्रीडा संचालक डॉ.दिनेश पाटील यांनी दिली.