शिरपूर । तलाठी महासंघाने उत्पन्नाच्या दाखल्यासह विविध प्रकारचे दाखले देणे बंद केल्यामुळे नागरीकांची प्रचंंड अडचण निर्माण झाली आहे. 1 महिना उलटूनही दाखले न मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. यामुळे त्वरीत दाखले देण्यात यावेत अशी मागणी धुळे जिल्हा काँग्रेस कमिटी ओ.बी.सी.सेलचे जिल्हाध्यक्ष शामकांत ईशी यांनी केली आहे. तलाठी महासंघाने उत्पन्न दाखला, रहिवासी दाखलासह विविध प्रकारे 35 दाखले देणे बंद केल्याने विद्यार्थ्यांना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.
एक महिना उलटूनही दाखले नाहीत
शालेय कामासाठी शिष्यवृत्ती कामी ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी, भरतीसाठी उत्पन्नासह विविध दाखल्यांची आवश्यकता भासत आहे. कर्ज प्रकरण, शेतकरी कर्जमाफी, वैद्यकीय कामासह अनेक कामांसाठी दाखल्यांची आवश्यकता आहे. एक महिना उलटूनही लोकांना दाखले मिळत नसल्याने जनतेची तलाठी कार्यालय, तहसिल कार्यालयात फरफट होत आहे. यासाठी शासनाने यावर तोडगा काढून प्रश्न मार्गी लावावा विद्यार्थी, शेतकरी व जनतेचे हाल अपेष्टा थांबवून निर्णय घ्यावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा धुळे जिल्हा काँग्रेस कमिटी ओ.बी.सी. सेल जिल्हाध्यक्ष शामकांत ईशी, शिरपूर तालुका युवक काँग्रेसाध्यक्ष देवेंद्र राजपूत, शहराध्यक्ष तुषार शेटे, काँग्रेस सेवादल तालुकाध्यक्ष विनायक कोळी, शहराध्यक्ष सुनिल चौधरी, अल्पसंख्यांक काँग्रेस तालुकाध्यक्ष ईर्फान मिर्झा, अनुसुचित जाती सेल तालुकाध्यक्ष पिंटू शिरसाठ यांचेसह काँग्रेस पक्षाच्या पदाधिकार्यांनी दिला आहे.