उत्पादन खर्चाच्या आधारावर भाव मिळविण्यासाठी आंदोलन

0

शहादा । खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी हितासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना काम करीत आहे. संघटना आंदोलन करीत असतांना कोणत्याही ठराविक कारखान्याच्या किंवा व्यक्तीच्या विरोधात नाही. मात्र, शेतकर्‍यांसह ऊस उत्पादकांना उत्पादन खर्चावर आधारीत भाव मिळावा ही संघटनेची मागणी आहे. ऊस परिषदेतील ठरावानूसार संघटनेमार्फत आंदोलन केले जात असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष घनश्याम चौधरी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. शहादा येथील विश्रामगृहावर पत्रकारांना संघटनेच्या भुमिकेबाबत माहिती देतांना ते बोलत होते. प्रकाशा येथे संघटनेचे प्रमुख खासदार राजू शेट्टी यांच्या उपस्थितीत झालेल्या ऊस परिषदेतील ठरावानूसार जिल्ह्यातील कारखान्यांनी ऊसाला भाव दिला जात नसल्याने संघटनेमार्फत ऊस तोडीस विरोध करण्यात येत असल्याने चौधरी यांनी सांगितले.

अधिकार्‍यांनी ठराव नाकारला
यावेळी संघटनेने प्रतीटन 2 हजार 750 रुपये भाव दिल्यास ऊस उत्पादक शेतकरी शंभर टक्के ऊस स्थानिक कारखान्यांना पुरविण्यास तयार असल्याचे सांगितले. मात्र कारखान्यांच्या अधिकार्‍यांनी हा ठराव नाकारला. चर्चेअंती जिल्हाधिकार्‍यांनी वाहतूक खर्च वजा जाता प्रतीटन 2 हजार 450 रुपये भाव द्यावा या मागणीस मान्यता दिल्याचे श्री.चौधरी यांनी सांगितले. शेतकर्‍यांना न्याय मिळावा यासाठी वेळप्रसंगी रस्त्यावर उतरण्यास तयार आहोत. संघटनेच्या सहकारी चळवळीस विरोध नसून शेतकर्‍यांना योग्य भाव मिळावा यासाठी संघर्ष सुरु राहिल असेही त्यांनी सांगितले.

शेतकर्‍यांच्या मालकीचा कारखाना
जिल्ह्यातील कोणताही कारखाना बंद होणार नाही यासाठी संघटना उभी राहील. म्हणूनच पुष्पदंतेश्वर सहकारी साखर कारखाना खाजगी व्यक्तिकडून पुनश्‍च शेतकर्‍यांच्या मालकीचा होण्यासाठी संघटना प्रयत्नशील आहे. कारखान्यांनी शेतकरी हिताचा निर्णय घेतल्यास संघटनेमार्फत करण्यात येईल असेही चौधरी यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. यावेळी वसंत पाटील, नथ्थु पाटील, रविंद्र पाटील, गणेश पाटील, रत्नदिप पाटील यांची उपस्थिती होती.

आंदोलनाची घेतली दखल
या आंदोलनांची दखल घेत जिल्हाधिकारी डॉ. एम. कलशेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी 10 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात ऊस उत्पादक शेतकरी, जिल्ह्यातील कारखान्यांचे अधिकारी, स्वाभिमानी शेतकरी संघटना, ऊस संघर्ष समितीचे पदाधिकारी यांच्यात चर्चा झाली. या चर्चेत गौतम पाडवी, महेंद्र पाटील, गोविंद पाटील, गणेश पाटील, रधुनाथ चौधरी, हरीकृष्ण चौधरी, संदीप पाटील, युवराज पाटील, दत्तु पाटील, विजय पाटील, ऋषीकेश पाटील, योगेश पाटील, सचिन पाटील, आमश्या पाडवी आदिंनी सहभाग घेतला.