कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी गहिवरले
जळगाव : शासकीय कर्मचारी असो की अधिकारी तो विशिष्ट काळात सेवा बजाविल्यानंतर निवृत्त होता. याचप्रमाणे सोमवारी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक सुधीर आढाव हे सेवानिवृत्त झाले. सोमवारी जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे, जिल्हा सरकारी वकील केतन ढाके, जातपडताळणी विभागाचे पोलीस उपअधीक्षक राजेंद्र रायसिंग व प्रभारी अधीक्षक सी.पी.निकम यांच्या प्रमुख उपस्थित आढाव यांना सपत्नीक निरोप देण्यात आला. दोन्ही हात जोडून सहकारी व कर्मचार्यांना अभिवादन करुन कार्यालयाबाहेर पडतात आढावा यांना अश्रू अनावर झाले होते. हुंदके देत रडत असलेले आढाव यांना बघून कर्मचार्यांनाही गहिवरुन आले.
30 सप्टेबर रोजी सुधीर आढाव हे सेवानिवृत्त झाले. नियमित तीन वर्षाचा कार्यकाळ या विभागात असताना आढाव यांना चार वर्ष येथे सेवा करण्याची संधी मिळाली. या चार वर्षाच्या काळात सुधीर आढाव यांनी शिपायापासून तर अधिकार्यापर्यंत सर्वांनाच प्रेमाची वागणूक दिली. तसेच संकटकाळी प्रत्येकाच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले. कार्यालयात कर्मचार्यांसाठी शुध्द व थंड पाण्याची व्यवस्था, सौरप्रकल्प तसेच कार्यालयाती सौंदर्यात भर पाडली. एका कर्मचारी मृत्यूशी झुंज देत असताना त्याला स्व:खर्चातून मदत केली, त्याशिवाय तत्कालिन जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर यांच्याकडे आलेल्या गरीब घरातील एका हुशार मुलीला उच्च शिक्षणासाठी स्वतःच्या खिशातून लाखमोलाची मदत केली. असे अधिकारी आजपर्यंत लाभले नाहीत…त्यामुळे ते आज आपल्यातून निरोप घेत असताना गहिवरुन आले व अश्रूंना वाट मोकळी करुन दिल्याचे कर्मचार्यांनी सांगितले.