उत्राणच्या दाम्पत्याला भरदिवसा बेदम मारहाण करीत लुटले

0

पाचोरा-जळगाव रस्त्यावरील रामदेववाडी रस्त्यावरील टेकडीवरील घटना ; घटनास्थळापासून काही अंतरावर शिरसोलीच्या तरुणाचा आढळला मृतदेह ; मयत लुटमार करण्यापैकी चौघापैकी एक असल्याची चर्चा

जळगाव : जळगाव येथून एरंडोल तालुक्यातील उत्राण येथे घरी परतणार्‍या दाम्पत्याला चौघांनी बेदम मारहाण करीत अंगावरील दागिणे लुटल्याची घटना गुरुवारी भरदिवसा साडेतीन वाजता पाचारो-जळगाव रस्त्यावरील रामदेववाडी रस्त्यावर टेकडीजवळ घडली. दिलीप काशिनाथ पाटील वय 360 व नेहा दिलीप पाटील रा. उत्राण ता.एरंडोल असे जखमी दाम्पत्याचे नाव आहे. दरम्यान याच घटनास्थळापासून काही शिरसोली येथील तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली असून संबंधित लुटमार करणार्‍यापैकी एक असल्याचा संशय पोलिसांना असून त्यापध्दतीने पोलीस जखमी दाम्पत्यांकडील संशयितांचे वर्णन तसेच इतर माहिती संकलित करुन चौकशी करत आहे. रात्री उशीरपर्यंत पोलिसांची चौकशी सुरु होती.

पत्नीने आरडाओरड करत वाहनधारकांना थांबविले
लुटमार व लुटमार करणार्‍यांच्या बेदम मारहाणीत रक्तबंबाळ पतीला वाचविण्यासाठी पत्नी नेहाने आरडाओरड करत ये-जा करणार्‍या वाहनधारकांना थांबण्यासाठी याचना केली. यावेळी औरंगाबाद येथे दुचाकीने जाणार्‍या जितेंद्र जायस्वाल हा तरुण थांबला. तोपर्यंत लुटणार करणारे पसार झाले होते. लुटमार झाल्याचा प्रकार कळताच जैसवाल यांनी रस्त्यावरील लोकांना थांबविले. जखमी दाम्पत्याला तेथून म्हसावद येथे दवाखान्यात नेण्यात आले.

लुटीमारीच्या घटनास्थळपासून 500 मीटर अंतरावर मृतदेह
ज्या ठिकाणी लुटीची घटना घडली, त्यापासून 500 मीटरच्या अंतरावर बळीराम आखाडू भील (19, रा.शिरसोली) या पाळधी येथे हॉटेलवर काम करणार्‍या कामगार तरुणाचा मृतदेह आढळला. शिरसोली येथील पोलीस पाटील श्रीकृष्ण बारी यांच्यामुळे त्याची ओळख पटली . रक्षाबंधनानिमित्त वरणगाव येथील बहिण सुशिला राहूल भील ही बुधवारी घरी आली होती. तिने रात्री बळीरामला राखी बांधली, नंतर सकाळी ती वरणगाव येथे रवाना झाली तर बळीराम देखील 11 वाजता हॉटेलवर जातो सांगून घराबाहेर पडला. यानंतर कुटुंबियांना थेट त्याच्या मृतदेह सापडल्याची माहिती कळाली. बळीरामच्या पश्‍चात भगवान, समाधान, दिलीप व सुभाष असे चार भाऊ, आई सुमनबाई व दोन बहिणी असा परिवार आहे. रात्री 7.30 वाजेच्या सुमारास एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरिक्षक रमेश वावरे, रतीलाल पवार, जितेंद्र राठोड यांनी मृतदेह जिल्हा रुग्णालयात आणला. मयत बळीरामचा भाऊ समाधान याचा जबाब नोंदविला.

अधिकार्‍यांसह फॉरेन्सिक तसेच श्वान पथकाकडून तपासणी
मृत झालेल्या बळीरामच्या अंगावर जखमा नाहीत, तसेच त्याच्या अंगावर फक्त अंडरवियर व तीही अर्धवट होती,शेजारी घडी केलेल्या शर्ट होता. त्याशिवाय तेथेच लुटमारही झाली आहे. त्यामुळे त्याच्या मृत्यूविषयी वेगवेगळे तर्क लावले जात आहेत. घटनेचे गांभीर्य लक्षात सहायक पोलीस अधीक्षक डॉ.नीलाभ रोहन, एमआयडीसीचे निरीक्षक रणजीत शिरसाठ, जितेंद्र राठोड, उपविभागीय कार्यालयातील अनिल पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे दिनेश बडगुजर, संदीप साळवे व त्यांचे सहकारी तातडीने घटनास्थळी रवाना झाले.फॉरेन्सिक व श्वान पथकाला घटनास्थळावर पाचारण करण्यात आले होते.