पुणे । गणेशोत्सव मंडळे सांस्कृतिक कार्यक्रम व देखाव्यांमधून सामाजिक संदेश देतात. त्याचा परिणाम समाजमनावर होतो. सातत्याने वर्षभर सामाजिक उपक्रम राबविणे हे अनेक मंडळांचे वैशिष्ट्य आहे. मंडळात जे पडेल ते काम कार्यकर्ते करतात. त्यामुळे त्यांना सर्व गोष्टींची माहिती असते. म्हणूनच ते खर्या अर्थाने मॅनेजमेंट गुरू आहेत. उत्सवाच्या माध्यमातून समाज एकत्र आला, तरच समाजातील मरगळ दूर होईल, असे सांगत महापौर मुक्ता टिळक यांनी कार्यकर्त्यांसह नागरिकांना एकत्र येण्याचे आवाहन केले.
लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप सोसायटीतर्फे 2015-16 मध्ये घेण्यात आलेल्या लोकमान्य महागणेशोत्सव स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभाचे आयोजन केसरी वाड्यातील लोकमान्य सभागृहात करण्यात आले. यावेळी शैलेश टिळक, सुशील जाधव, पराग ठाकूर आदी उपस्थित होते. सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, रोख रक्कम असे पारितोषिकाचे स्वरूप होते.
या स्पर्धेत सहकारनगरमधील अरण्येश्वर मित्रमंडळ गवळीवाडाने सर्वोकृष्ट मंडळाचे पारितोषिक पटकाविले. तर, गणेश पेठेतील काळभैवनाथ तरुण मंडळाने द्वितीय आणि येरवड्यातील अष्टविनायक मित्र मंडळाने तृतीय क्रमांक मिळविला. तसेच सोसायटी विभागात चिंचवडमधील आनंदवन सोसायटीने प्रथम क्रमांक पटकाविला. आनंद सराफ यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
धनकवडीतील आदर्श मित्र मंडळासह हिंदमाता तरुण मंडळ, वीर शिवराज मंडळ, संयुक्त प्रसाद मंडळ, एस.के.एफ.चिंचवड, महाराष्ट्र तरुण मंडळ, पोटसुळ्या मारुती, शिवसम्राट मंडळ, धर्मवीर शंभूराजे मंडळ, अष्टविनायक मंडळ, भैरवनाथ तरुण मंडळ या मंडळांचा विशेष सन्मान करण्यात आला. सोसायटी विभागात समृद्धी सोसायटी आंबेगाव, आदर्शनगर गुलटेकडी, विशाल रेसिडेन्सी चाकण, विशाल पार्क चाकण आणि नवपिनाक सोसायटी औंध यांना गौरव पारितोषिके देण्यात आली.