उत्सवाचे बाजारीकरण थांबवा, कुणीही हरकत घेणार नाही

0

मुंबई : उत्सवांच्या सादरीकरणावरून सध्या वातावरण तापलेले दिसून येत आहे. उत्सव आधी आलेत, कायदे नंतर अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर राज ठाकरे यांनी याबाबत सौम्य भूमिका घेतली आहे. उत्सवांचे सुरु असलेले बाजारीकरण थांबवा, मग आयोजनांवर कुणीच हरकत घेणार नाही, असा सल्ला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला आहे. दहीहंडी उत्सव समन्वय समितीच्या कार्यकर्त्यांनी आज राज ठाकरे यांची भेट घेतली. त्यावेळी राज यांनी समन्वय समितीच्या कार्यकर्त्यांना ही सूचना केली.

पारंपारिकतेला महत्व द्या
उत्सवांमध्ये डीजे, लाऊडस्पीकर, सेलिब्रेटीज नको, पारंपारिक ढोल ताशाच्या गजरात दहीहंडी साजरी करा, अशी भूमिका ठाकरे यांनी दहीहंडी उत्सव समन्वय समितीच्या पदाधिकाऱ्यांपुढे यावेळी मांडली. दहीहंडी उत्सवाच्या आयोजनावर आलेले निर्बंध आणि न्यायालयात सुरु असलेल्या कायदेशीर लढाईची माहिती यावेळी कार्यकर्त्यांनी राज ठाकरेंना दिली.

प्रस्ताव केंद्राकडे
दुसरीकडे दहीहंडी मंडळाची बाजू सुप्रीम कोर्टात मांडण्यासाठी राज्य सरकार विशेष कौन्सिल तुषार मेहता यांची नेमणूक करणार आहे. दहीहंडीपर्यंत नियमात बदल न झाल्यास राज्य सरकारकडून विशेष अध्यादेश काढला जाणार आहे. गणेशोत्सव आणि दहीहंडी उत्सवाच्या अटींच्या कायद्यात बदल करण्यासाठी केंद्राकडे प्रस्ताव पाठवला आहे. पारंपारिक सण हे साजरे होतीलच. त्यासाठी लागणाऱ्या परवानग्या देण्यात याव्यात, असे आदेश मुख्यमंत्र्यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत.