धुळे। मुस्लिम धर्मियांच्या शब- ए- बारात (जागरण रात्र) निमित्त कब्रस्तान, मशीद, दर्गा येथे मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने नमाज पठण करतात तसेच 10 मे रोजी बुध्दपौर्णिमा साजरी करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर धुळे जिल्ह्यात 22 मे च्या रात्री 12 वाजेपर्यंत मुंबई पोलिस कायदा कलम 37 (1) (3) चे मनाई आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी लागू केले आहेत. या आदेशात म्हटले आहे, जिल्ह्यात शब- ए- बारात व बुध्द पौर्णिमा साजरी करण्यात येणार आहे. धुळे जिल्ह्याची पार्श्वभूमीवर पाहता किरकोळ कारणावरुन दोन समाजामध्ये वाद होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आगामी काळात शब-ए- बारात व बुध्द पौर्णिमा या सणाच्या दरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी मदत व्हावी म्हणून 8 मे चे 00.01 वाजेपासून ते 22 मेचे 24 वाजेपावेतो संपूर्ण धुळे जिल्ह्यात मुंबई पोलिस अधिनियम 1951 चे कलम 37 (1)(3) लागू करणेबाबत विनंती केली आहे.
असामाजिक कृत्य करण्यास मनाई
जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्याकामी पोलिसांना मदत व्हावी, पोलिस अधीक्षक, धुळे यांनी सादर केलेला अहवाल पाहता जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी व परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांना मदत व्हावी म्हणून जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी डॉ. पांढरपट्टे यांनी त्यांना मुंबई पोलिस अधिनियमानुसार प्राप्त अधिकाराचा वापर करून जिल्ह्यातील कोणत्याही इसमास असामाजिक कृत्य करण्यास मनाई करण्यात आली आहे.
पाचपेक्षा अधिक व्यक्ती नको
सभा घेण्यास, मिरवणूक काढण्यास, पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्ती एकत्र येण्यास मनाई करण्यात आली आहे. उपविभागीय दंडाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी यांनी दिलेल्या परवानगीशिवाय काढण्यात आलेले मोर्चे, रॅली, सभा, मागील 37 (1)(3) हा आदेश ज्यांना लाठी अगर तत्सम वस्तू घेतल्याशिवाय चालता येत नाही, अशा अपंग व्यक्तींना लागू नाही. तसेच शासनाच्या सेवेतील व्यक्तींना आपल्या वरिष्ठांच्या आदेशानुसार कर्तव्यपूर्तीसाठी हत्यार बाळगणे आवश्यक आहे, त्यांना लागू होणार नाहीत.
… तर हवी परवानगी
मुंबई पोलिस अधिनियमानुसार उपविभागीय दंडाधिकारी यांचे पूर्वपरवानगीशिवाय पाचपेक्षा जास्त व्यक्तींचा समावेश असलेल्या कोणत्याही मंडळीस किंवा मिरवणुकीस मनाई करण्यात आली आहे. या कालावधीत सभा, मिरवणुका, मोर्चा इत्यादी परवानगीबाबत पोलिस विभागाच्या अधिकार्यांच्या सहमतीने उपविभागीय दंडाधिकारी यांनी कायदा व सुव्यवस्था राखणेबाबत योग्य तो निर्णय घेवून परवानगी द्यावी. अशी देण्यात आलेली परवानगी तसेच लग्न मिरवणुका, धार्मिक मिरवणुका, आठवडेबाजार अगर प्रेतयात्रेच्या जमावास सदर निर्बंध लागू होणार नाहीत, असेही या आदेशात नमूद करण्यात आले आहे.