उत्सवातून देश बलवान करा

0

पुणे (राजेंद्र पंढरपुर)। सार्वजनिक गणेशोत्सवाची सव्वाशे वर्षांची वाटचाल असून तरूणांचा मोठा सहभाग नेहमीच असतो. या तरुणांनी उत्सवातून देश बलवान करण्यासाठी झोकून द्यायला हवे, असे आवाहन श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे अध्यक्ष अशोकराव गोडसे यांनी जनशक्तीशी बोलताना केले.

आदर्श दिशेने वाटचाल
हा देवाचा उत्सव आहे, त्यामुळे त्यातील धार्मिकता सांभाळली, त्याबरोबर आरोग्य, शिक्षण, जलसंधारण, आपत्ती निवारण अशा क्षेत्रामध्ये ट्रस्टने भरीव काम गेल्या काही वर्षात केले आहे. ग्रामीण भागात-पुणे जिल्हा परिसरात 65 शाळांमध्ये ई लर्निंग सेवा देऊ केली आहे, शहरात शेक्षणिक पालकत्व योजना राबविली आहे, वह्या, पुस्तक याची मदत दिली जातेच पण तेवढ्यावर न थांबता मुलाच्या जडण घडणीची जबाबदारी ट्रस्टच्या कार्यकर्त्यांनी, हितचिंतकांनी पेलली आहे. देवदासींची मुले, रात्रीच्या वेळी कचरा गोळा करणारी मुले यांच्या करिता बाल संगोपन केंद्र चालवतोय. खडकवासला धरणातील गाळ उपसणे, पुरंदर तालुक्यात पाणी पुरविणे, पिंगोरी गावाचा विकास करणे अशी बहुविध कामे उत्सवाच्या माध्यमातून आणि आमच्या आधीच्या पिढीने जी दिशा दाखवली त्या आदर्श दिशेने चालू आहेत.

देवाच्या पैशातून समाजाची सेवा
गणेशोत्सवात अशोकराव गोडसे यांचा पन्नासहून अधिक वर्षे सक्रीय सहभाग राहिला आहे. शताब्दी महोत्सवातही ते सक्रीय होते आणि शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षात ट्रस्टचे ते नेतृत्व करीत आहेत. उत्सवातील प्रदीर्घ अनुभव सांगताना त्यांनी यापुढील वाटचालीत तरुणाईचा सहभाग कसा असावा यावर मौलिक भाष्य केले. आणि तरूणांकडून काही अपेक्षाही व्यक्त केल्या. प्रतापराव गोडसे, उल्हास शेडगे, मामासाहेब रासने, शंकरराव सूर्यवंशी, काशिनाथ रासने, दुर्गादत्तजी शर्मा, शामकुमार शर्मा, धर्मराज राउत, वसंतराव कोद्रे, दत्तोपंत केदारी, कुमार वाम्बुरे यांच्या सारख्या धुरिणांनी उत्सव लोकाभिमुख व्हावा, समाजकार्य त्यातून उभे राहावे याकरिता प्रयत्नांची पराकाष्ठा केली. ट्रस्टमधील आम्ही कार्यकर्त्यांनी ते सारे पाहिले, ते संस्कार झाल्याने एक आखीव, प्रमाणबद्ध कार्य आजही उभे राहात आहे, यापुढेही राहील. देवाच्या पेटीत येणारा पैसा हा समाजाकरिता, उपेक्षित वर्गाकरीता जास्तीत जास्त उपयोगात यावा ही भूमिका ठेऊन कार्य चालू आहे.

उत्सवात आचारसंहितेचे भान ठेवा
केवळ पुण्यापुरते हे कार्य न रहाता राज्याच्या अनेक भागाशी संपर्क ठेऊन चालू केले आहे, वर्षभर मी अनेक गावात याकरिता जातो, तरुण मुलांना विधायक काम करायचे आहे. ते ट्रस्टचे अनुकरण करतात. माझा अनुभव असा सांगतो कि हा उत्सव सुधारणेच्या मार्गावर आहे, 65 टक्के तरी सुधारणा झाली आहे असे मी म्हणेन, असे मोठ्या आत्मविश्वासाने गोडसे म्हणाले. तरुणांनी उत्सवात आचारसंहितेचे भान ठेवले पाहिजे, देवाच्या या उत्सवात मद्यपान, चमत्कारिक नृत्य, कर्णकर्कश संगीत हे प्रकार टाळले पाहिजेत. गणपती उत्सवाच्या माध्यमातून तरुणाईने एकत्र यावे, समाजातील छोट्या मोठ्या प्रश्नांना भिडावे, ते सोडवावेत. यातून उत्सवाचा हेतू साध्य होईल, लोकमान्य टिळक यांनी या माध्यमातून स्वातंत्र्याची प्रेरणा दिली आपण सुराज्य करूया, देश बलवान करूया, असे माझे सांगणे राहील असे मनोगत गोडसे यांनी मांडले.