मुंबई| ऑगस्ट महिन्याच्या 14 तारखेला श्रीकृष्ण जयंती असून त्यादिवसाची सर्वच जण खूप आतुरतेने वाट पाहत आहेत. याच गोपाळकाला सणाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी मुंबई पत्रकार संघात दहीहंडी महाराष्ट्र समन्वय समितीने महाराष्ट्रातील सर्व दहिहंडी उत्सव साजरा करणार्या आयोजकांना दहिहंडी उत्सव शिस्तीत पार पाडण्याचे आवाहन केले आहे. यासाठी मुंबई मराठी पत्रकार परिषदेत पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी समितीचे अध्यक्ष बाळा पडेलकर, उपाध्यक्ष सुरेंद्र पांचाळ, सरचिटणीस गीता झगडे, सल्लागार अभिषेख सुर्वे हे उपस्थित होते.
गोविंदा पथकांना महत्त्व द्या
दहीहंडी उत्सवात मोठ्याने लावण्यात येणारे लाऊड स्पिकर यामुळे मोठ्या प्रमाणात ध्वनी प्रदूषण होते. तर यंदा शहरातील प्रत्येक आयोजकाने सामान्य माणसांचा विचार करुन दहिहंडी उत्सवाचे आयोजन करावे. त्याचबरोबर डिजे, लाऊड स्पिकर यांना महत्त्व न देता दहिहंडीच्या दिवशी केवळ गोविंदा पथकांना महत्त्व द्यावे, असे आवाहन समितीचे अध्यक्ष बाळा पडेलकर यांनी केले.
पारंपरिकतेला महत्त्व आवश्यक
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीनंतर केलेल्या मार्गदर्शनानुसार दहिहंडी ही पारंपरिक पद्धतीने साजरी करण्याचे आवाहन यावेळी बाळा पडेलकर यांनी सर्व आयोजकांना दिले. त्याचबरोबर 10 जुलै रोजी कोर्टात होणारा निकाल काहीही असला तरी यंदा दहिहंडी उत्सव जोरात आणि उत्साहात साजरा करण्याचे आश्वासनही यावेळी देण्यात आले होते.