पुणे : यंदाही पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यात येणार आहे. त्यानुसार राष्ट्रीय केमिकल्स अॅन्ड फर्टिलायझर्स यांच्याकडून प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्ती विसर्जनासाठी 100 टन अमोनियम बायकार्बोनेट घेण्यासाठी 19 लाख 10 हजार रुपये खर्चाला स्थायी समितीने मंजुरी दिली.
प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्तींमध्ये वापरल्या जाणार्या रंगांमध्ये जलप्रदूषणात मोठी भर पडत असल्याने राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेने (एनसीएल) अमोनियम बायकार्बोनेटचा पर्याय शोधून काढला. या रसायनामध्ये या मुर्त्या विरघळू शकतील, हे संशोधनाने सिद्ध केले आहे. त्याला महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, कृषी विभागाने प्रमाणितही केले आहे. मागील वर्षी सुमारे 85 टन अमोनियम बायकार्बोनेटचे वाटप करण्यात आले असून, सुमारे 25 हजार मुर्त्या यामध्ये विसर्जित करण्यात आल्याचे घनकचरा व्यवस्थापन विभागप्रमुख आणि उपायुक्त सुरेश जगताप यांनी सांगितले. यंदाही क्षेत्रीय कार्यालयाच्या माध्यमातून याचे वाटप केले जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
प्रशासनाचा दावा
गणेश मूर्तींचे वजन, आकारमान, पाण्याचे नेमके प्रमाण हेच माहीत नसल्याने मागच्यावर्षी मूर्ती विसर्जनात अडचणी आल्या होत्या. मात्र ही अडचण यंदा येणार नसल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. द्रावणाचे प्रमाण कमी-जास्त झाल्याने मुर्त्यां पूर्ण विरघळल्या नव्हत्या. द्रावण झाडांसाठी खत असल्याचे सांगितल्याने ते अनेकांनी कुंडीतील रोपांना टाकले, परंतु द्रावण जास्त झाल्याने रोपटी मरून गेली. त्यामुळे नेमके प्रमाण किती वापरावे याचे गणित सर्वसामान्यांना माहीत नाही. या सर्व प्रकारामुळे यंदा हे द्रावण मूर्ती विसर्जनासाठी वापरण्यात येईल की नाही, याबाबत शंका निर्माण झाली आहे. याबाबत प्रशासनाकडे खुलासा केला असता एनसीएलमध्ये सुरू असून, गणेशोत्सवाच्या आधी ऑगस्टमध्येच याविषयीचा खुलासा त्यांच्याकडून करण्यात येईल, तो गणेशोत्सव सुरू होण्याआधी आम्ही प्रसिद्धीमाध्यमातून जाहीर करू, असेही जगताप यांनी नमूद केले.