उत्सव काळात शहरातील सामाजिक सलोखा कायम राखण्याची गरज

0

वरणगाव। वरणगाव शहरात सर्व धर्मीय गुण्या गोविंदाने राहतात, सध्या मुस्लीम बांधवांचे पवित्र रोजे सुरु आहेत. अशा उत्सव काळात सर्व धर्मियांनी जातीय सलोखा कायम राखून कुठलेही गालबोट लागणार नाही याची काळजी घेऊन कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याचे आवाहन अप्पर पोलीस अधिक्षक बच्चनसिंग यांनी केले. येथील पोलीस स्टेशन मध्ये अप्पर पोलिस अधिक्षक यांच्या उपस्थित शांतता कमिटीची बैठक घेण्यात आली. यात वरणगांव शहरातील व परिसरातील कायदा व सुव्यस्था या विषयी तक्रारी व सुचना शांतता कमिटीच्या सदस्यांच्या वतीनी सांगण्यात आल्या. या तक्रारीची व सुचनांची दखल पोलीस प्रशासन निश्चित घेईल असे अप्पर पोलीस अधिक्षक बच्चन सिंग यांनी सागितले.

बसस्थानक परिसरात पोलीस कर्मचारी तैनात करण्याची मागणी
अप्पर पोलीस अधिक्षक बच्चन सिंग यांच्यासमोर पोलीस कवायत सादरीकर होऊन सलामी देण्यात आली. यानंतर पोलिस शांतता समितीची बैठक घेण्यात आली. याप्रसंगी नगराध्यक्षा अरुणा इंगळे यांनी बसस्थानक चौकात चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून प्रवाशांचे साहित्य चोरीस जात आहे. त्यामुळे प्रवाशांची सुरक्षा धोक्यात आली असून सुरक्षेच्या दृष्टीने याठिकाणी पोलीस कर्मचार्‍याची नियुक्ती करुन कायमस्वरुपी गस्त घालण्याची मागणी केली.

गटनेते सुनिल काळे व मिलींद मेढे यांनी पोलीस कर्मचार्‍यांचे संख्याबळ वाढवून देण्याची मागणी केली. शहरात पोलीसांचे संख्याबळ कमी आहे. त्यामुळे सण- उत्सव काळात पोलीसांवर अतिरीक्त कामाचा ताण पडत असतो. त्यामुळे काही ठिकाणी पाहिजे त्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त मिळू शकत नाही, तसेच आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास बाहेरुन अतिरीक्त पोलीस कर्मचारी मागवावे लागतात. त्यामुळे पोलीस कर्मचार्‍यांची संख्या वाढवुन मिळावे जेणे करुन या ठिकाणी शांतता अबाधित राहण्यास मदत होईल. अशा सुचनाही केल्या.

दारुविक्री बंद करावी
तसेच नगरसेविका वैशाली देशमुख यांनी शहरातून जाणार्‍या महामार्गावरील सर्व परमीटरुम बार मध्ये व बिअर शॉपी, धाब्यांवर सर्रास खुलेआम दारु विक्री सुरु असल्याचे निर्दशनास आणुन दिले. या सर्व सुचनांवर कार्यवाही करण्यात येईल असे अप्पर अधिक्षक बच्चनसिंग यांनी सांगीतले. यावेळी मुक्ताईनगरचे विभागीय पोलीस अधिक्षक सुभाष नेवे, सहाय्यक पोलीस निरीक्षक गांगुडे, पीएसआय वाघ, उपनगरध्यक्ष शेख अखलाख नगरसेवक सुधाकर जावळे, मकसुद अली, संजय कोलते, मिर्झा शेख आदी उपस्थित होते.