उदयनराजेंना वेगळा अन् रोहित टिळकांना वेगळा न्याय का?

0

पुणे : लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे खापरपणतू आणि काँग्रेसचे युवानेते रोहित टिळक यांच्याविरोधात मारहाणीचे, शिविगाळ केल्याचे, धमकी दिल्याचे पुरावे असतानाही त्याला जामीन मिळत असेल तर यामुळे समाजात चुकीचा संदेश जात आहे. यापुढे अशाप्रकारच्या गुन्ह्यात तक्रार देण्यासाठी महिला पुढे येण्यास धजावणार नाहीत. एका गुन्ह्यात छत्रपती उदयनराजे भोसलेंना न्यायालय जामीन नाकारत असेल तर बलात्कारासारख्या गंभीर गुन्ह्यात रोहित टिळकला वेगळा न्याय का? असा प्रश्न पीडित महिलेने सोमवारी (दि.31) पत्रकार परिषदेत उपस्थित केला.

आई नसल्याचे सांगून महिलांना जाळ्यात ओढले!
पीडित महिलेने यावेळी रोहित टिळकवर अनेक गंभीर आरोप केले. रोहित टिळक हा आई नसल्याचे सांगून महिलांना जाळ्यात ओढून त्यांची फसवणूक करत आहे, असा गंभीर आरोप केला. अशाप्रकारे त्याने अनेक महिलांना फसवले असल्याची शक्यता पीडितेने व्यक्त केली. यापूर्वीही रोहित टिळकने मारहाण केली होती. त्याची तक्रार खडकी पोलिस ठाण्यात केली होती. तेव्हा यापुढे मारहाण करणार नाही, असे सांगत त्याने बॉण्डवर लिहून दिले होते. पोलिसात जाऊ नये यासाठी सतत धमक्या दिल्या जात असून, अ‍ॅसिड टाकण्याची धमकी दिली आहे, असेही ही पीडिता म्हणाली.

निवडणूक आणि इतर कामांसाठी 58 लाख घेतले
आरोपीने निवडणुकीच्या कामासाठी, कर्ज फेडण्यासाठी आणि लंडनला जाण्यासाठी वेळोवेळी आपल्याकडून 58 लाख रुपये घेतले आहे, असे पीडित महिलेने सांगितले. तीन वर्षाच्या कालावधीतील वेगवेगळे पुरावे सादर करूनही त्याला जामीन मिळतोच कसा, असा प्रश्नही पीडितेने यावेळी उपस्थित केला. न्याय नाही मिळाला तर उच्च न्यायालयात जाण्याचीही तयारी आहे, असेही यावेळी पीडितेने सांगितले.