नवी दिल्ली : कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी शिव प्रतिष्ठानच्या संभाजी भिडे, हिंदू एकता आघाडीचे मिलिंद एकबोटे यांच्याविरोधात अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला असताना आणि दलित संघटनांचे नेते त्यांच्यावर कारवाईची मागणी करत असताना, खासदार उदयनराजे भोसले हे भिडे गुरुजींच्या पाठीशी उभे राहिले आहेत. भिडे गुरुजी हे वडीलधारी व्यक्ती आहेत. त्यांच्याबद्दल मला आदर आहे. कोरेगाव भीमा येथे जे घडले त्याच्याशी त्यांचा काही संबंध नाही. जे त्यांच्याविरुद्ध बोलताहेत त्यांची त्यांना बोलायची लायकी नाही, असे उदयनराजेंनी म्हणाले. भिडे गुरुजींशी आपण फोनवर बोललो, तेव्हा या सगळ्या प्रकरणावर बोलताना त्यांना रडू आले. या प्रकाराची आपला काहीही संबंध नसल्याचे त्यांनी सांगितले. मिलिंद एकबोटे हेही आपले मित्र असल्याचे उदयनराजे म्हणाले.
स्वार्थासाठी जात-पात
उदयनराजे म्हणाले, मी कधीच जात-पात मानत नाही. हा सगळा वाद अस्वस्थ करणारा आहे. समाजात तेढ निर्माण करणार्यांवर कारवाई झालीच पाहिजे. हे जर असेच सुरू राहिले तर राज्याचेच नव्हे तर देशाचे तुकडे होतील. देशाचे तुकडे बघण्यापेक्षा मी मरण पत्करेन. स्वराज्यासाठी त्याग करणारे शिवाजी महाराज, संभाजी महाराज हे श्रेष्ठ होते. त्यांचाही मान ठेवणार नसाल तर आपली लायकी काय आहे?, असा सवालही त्यांनी केला. कोरेगाव भीमा इथे नेमके काय घडले, कशामुळे घडले याचा कुणी विचार केला का? कशाचीही खातरजमा न करता लोकांना भडकवले जात आहे. उद्या अन्य जातींमध्ये किंवा ग्रामीण विरुद्ध शहरी वाद पेटला तर तो किती महागात पडेल? त्यामुळे कारण नसताना उद्रेक होईल. मी या सगळ्या प्रकारावर आमनेसामने चर्चा करायला तयार आहे. त्यांचे जे कुणी प्रमुख नेते असतील, त्यांनी मुंबई-पुण्यात कुठेही यायला सांगावे. मी तिथल्या तिथे सगळी उत्तरे देईन, असे आव्हानही त्यांनी दिले.