सातारा – सातारा जिल्ह्यातील लोणंद येथील एका उद्योगाच्या व्यवस्थापकाकडे खंडणी मागितल्याप्रकरणी खासदार उदयनराजे भोसले यांना सातारा पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. दुसरीकडे, या अटकेच्या निषेधार्थ समर्थकांनी शहरातील रस्त्यावर टायरांना आगी लावून उदयनराजे यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली. सातारा बंदही पुकारण्यात आला. उदयनराजे यांनी कार्यकर्त्यांना शांतता राखण्याचे आवाहन केले.
उदयनराजेंनी सुरुवातीला सातारा जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. तो नामंजूर झाल्यानंतर त्यांनी मुंबई उच्च न्यायालयातही धाव घेतली होती. तेथेही हा अर्ज फेटाळला गेल्यानंतर उदयनराजेंना अटक होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत होती. शिवघराण्याच्या राजमाता कल्पनाराजे व इतर सहकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर खासदार उदयनराजे मंगळवारी सकाळी स्वत:हून सातारा शहर पोलीस ठाण्यात हजर झाले. त्यांची वैद्यकीय चाचणी करून कायदेशीर अटकेची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्यांना पोलीस जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर, उदयनराजे समर्थक आणि सातारकरांकडून बाजार पेठेसह शहरातील दुकाने उत्स्फूर्तपणे बंद करण्यात आली. कॉ. नाना पाटील रुग्णालय, पोवईनाका आणि शहरात पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली होती.
उदयनराजे यांच्या विरोधात खंडणी व हत्येचा प्रयत्न असे गुन्हे दाखल झाल्यानंतर गेल्या 3 महिन्यांपासून ते साताऱ्याबाहेर होते. तब्बल 100 दिवसांनंतर उदयनराजे शुक्रवारी सायंकाळी साताऱ्यात दाखल झाले होते. ते आल्याचे समजताच गांधी मैदानाजवळ कार्यकर्त्यांनी हारतुरे घालून त्यांचे जंगी स्वागत केले होते. तसेच राजवाडा परिसरातही पोलिसांसमक्ष फटाके फोडण्यात आले होते. समर्थकांनी गर्दी केल्यानंतर कायदा आणि सुव्यवस्था लक्षात घेऊन पोलिसांनी उदयानराजेंना अटक केली नव्हती. मंगळवारी मात्र राखीव पोलीस दल ठिकठिकाणी तैनात करण्यात आले होते.
उदयनराजे स्वत: पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाले तेव्हा त्या ठिकाणी पोलीस अधिकारी नव्हते. गंमत म्हणजे उदयनराजे स्वत: पोलीस अधिकाऱ्यांच्या दालनात रिकाम्या खुर्ची समोर बसून होते. त्यानंतर ते जलमंदिराकडे रवाना झाले आणि पुन्हा पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाले. खासदार उदयनराजे पोलीस ठाण्यात पोहोचल्याचे समजताच समर्थकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती.
काय आहे प्रकरण
लोणंद येथे सोना एलाईज नावाचा लोखंडाच्या भुकटीपासून विटा तयार करण्याचा कारखाना आहे. या कंपनीतील कामगारांचे वेतनवाढीसाठी आंदोलन सुरु आहे. कंपनीत उदयनराजेंच्या नेतृत्वाखाली कामगारांची संघटना आहे. कंपनीचे व्यवस्थापक जैन यांनी मार्चमध्ये पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. भोसलेंनी 18 फेब्रुवारी रोजी सातारा विश्रामगृहात बोलावून खंडणीची मागणी केली आणि बेदम मारहाण केली, अशी ही तक्रार होती. या प्रकरणी उदयनराजे आणि साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणात नऊ जणांना अटकही झाली होती. या प्रकरणात कोल्हापूरचे खासदार संभाजी राजे, खासदार राजीव सातव, संभाजीराव भिडे गुरुजी तसेच आमदार जितेंद्र आव्हाड यांनी उदयनराजेंची पाठराखण केली होती.