मुंबई । उदयांचल स्कूलची शर्वरी परुळेकर भलतीच नशीबवान ठरली. केवळ कमी वेळा नियमोल्लंघन केल्याचा फायदा मिळाल्यामुळे पंचरंगी अॅथलेटिक्स स्पर्धेत मुलींच्या 18 वर्षे गटातील लांब उडी स्पर्धेत ती पहिल्या क्रमांकाची मानकरी ठरली. अन्य स्पर्धामध्ये 12 वर्षे मुलांच्या गोळाफेक स्पर्धेत अंजुमन ए इस्लामच्या शहाजहान शेखने नवीन स्पर्धा विक्रम नोंदवला. इंडिया मास्टर्स अॅथलेटिक्सतर्फे ठाणे, पालघर, मुंबई, रायगड आणि मुंबई उपनगर जिल्ह्यांचा समावेश असलेल्या या स्पर्धेचे तिसर्या वर्षी आयोजन करण्यात आले आहे. मुंबई विद्यापीठाच्या मरीन लाइन्स येथील विद्यापीठ क्रीडा संकुलात सुरू असलेल्या या स्पर्धेतील मुलींच्या लांब उडी स्पर्धेत शर्वरीला आव्हान मिळाले ते फादर अग्नेल जिमखान्याच्या तनिष्का शेट्टीकडून. शर्वरी आणि तनिष्काने सारखीच 5.23 मीटर अशी कामगिरी साधली. पण एकूण सहा प्रयत्नांपैकी शर्वरीकडून एकदाच चूक झाली तर तनिष्काच्या तब्बल चार वेळा चुका केल्या. त्यामुळे शर्वरीला पहिले आणि तनिष्काला दुसरा क्रमांक देण्यात आला.
भारतीय क्रीडा प्राधिकरणाची अनुराधा दुबे 4.70 मीटर अशा कामगिरीसह तिसर्या क्रमांकावर आली. मुलांच्या 12 वर्ष गटातील गोळा फेक स्पर्धेत नवीन स्पर्धा विक्रम नोंदवताना शहाजहान शेखने पहिल्या स्पर्धेतील 11.80 मीटरचा विक्रम मोडीत काढला. व्हीपीएमच्या राज सोनारने 9.17 मीटर अशी फेक करत दुसरे स्थान मिळवले. अंजुमन इस्लामचा रोशन भारद्वाज(8.90 मीटर ) तिसरा आला.
अन्य निकाल : 5000 मीटर धावणे : महिला : अक्षय जाडीयार (सेव्हन स्टार्स स्पोर्ट्स अकादमी ) 21: 12: 99 मिनिटे, शेर्लि फुर्ताडो ( सॅवियो स्पोर्ट्स )22: 45 : 79 मिनिटे, मंजुळा षण्मुगम (अमेय क्लासिक क्लब ). पुरुष : शशी दिवाकर (सेंच्युरी रेयॉन ) 12: 37:44 मिनिटे, विवेक विश्वकर्मा (जेएसडब्ल्यू स्पोर्ट्स )16:12:18 मिनिटे, पंकज चौधरी (आयनफिट) 16: 54 : 12 मिनिटे.
गोळाफेक : महिला : अमृता गावित (ट्रॅक अँड फिल्ड )25:52 मीटर , गौरी भोसले (सेव्हन स्टार्स स्पोर्ट्स अकादमी) 23.93 मीटर, अदरिन शेख (टेकनॉमिट्स) 23.36 मीटर. पुरुष : तेजस डोंगरे (खालसा महाविद्यालय) 38.22 मीटर, अयान मंडल (आयआयटी पवई) 33.29 मीटर, नीरज सिंग (क्रीडा भारती) 27.36 मीटर.