पुणे । शास्त्रीय संगीताबद्दल बोलण्याचा मला अधिकार नाही. मात्र, आजकाल सुगम संगीताच्या बाबतीत परिस्थिती बिघडत चालली आहे. पूर्वीप्रमाणे आता संगीताविषयी आस्था राहिलेली नाही. तंत्रज्ञानामुळे कष्ट कमी झाले आहेत, त्यामुळे गाण्याची तळमळ कमी झाली आहे. उदयोन्मुख कलाकारांचा रियाझही कमी पडत आहे, अशी खंत ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की यांनी व्यक्त केली.
गांधर्व महाविद्यालयात पं. विष्णू दिगंबर पलूसकर, पं. विनायकराव पटवर्धन आणि पं. द. वि. पलूसकर या तीन दिगग्ज गुरूंच्या नावातील आद्याक्षरांपासून सुरू करण्यात आलेल्या वि. वि. द. स्मृती समारोहामध्ये पं. उल्हास कशाळकर यांना पं. विष्णू दिगंबर पलूसकर स्मृती गुरुगौरव पुरस्कार, ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की यांना पं. विनायकराव पटवर्धन संगीत जीवनगौरव पुरस्कार, हार्मोनिअमवादक सुयोग कुंडलकर यांना गोविंदराव टेंबे संगीतकार पुरस्कार, गायिका सुरश्री जोशी यांना रामकृष्णबुवा वझे पुरस्कार मठाचे मठाधिपती श्रीकांत आंनद यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या वेळी तालयोगी पं. सुरेश तळवलकर, संस्थेचे अध्यक्ष रवी परांजपे, प्राचार्य प्रमोद मराठे उपस्थित होते.
गायनामध्ये माधुर्य गरजेचे
पत्की म्हणाले, गुरूंनी मला केवळ शागीर्द म्हणून कधीच शिकवले नाही. शिष्य कायमच गुरूंच्या अस्तित्वाचा भाग असतात. संगीताची साधना करत असताना गायनामध्ये माधुर्य निर्माण होणे गरजेचे असते.
गुरूंच्या कृपेने हा पुरस्कार
सुरश्री जोशी म्हणाल्या, गुरूंच्या कृपेने मला हा पुरस्कार मिळाला आहे. त्यांच्यामुळे आजवरचा प्रवास झाला असून यापुढेही माझ्याकडून संगीताची निस्सीम सेवा घडण्यासाठी प्रयत्न करेन. सुयोग कुंडलकर म्हणाले, गोविंदराव टेंबे यांच्या नावाने पुरस्कार मिळणे हे माझे भाग्य आहे. मला कलेची कोणतीही पार्श्वभूमी नाही. तरीही आई-वडिलांनी कायम प्रोत्साहन दिले.