उद्घाटनालाच मुख्यमंत्र्याचे भाषण सुरु असतांना नवीन इमारतीतून पाणी गळती

0

पुणे : पुणे महापालिकेच्या विस्तरीत इमारतीचे उपराष्ट्रपतींच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. पण ऐन उद्घाटनाच्या कार्यक्रमातच पालिका प्रशासनावर नामुष्की ओढवली. उद्घाटन प्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भाषण सुरु असताना, ज्या नवीन सभागृहात कार्यक्रम सुरु होता त्यातील एका कोपऱ्यात पाणी गळायला सुरुवात झाली.

पुणे महापालिकेच्या विस्तारित इमारतीच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला सुरुवात होण्याच्या वेळेस पुण्यात जोरदार पावसाला सुरुवात झाली होती आणि पहिल्याच जोरदार पावसात पालिकेची ही नवीन इमारत गळायला सुरुवात झाली. एकीकडे मुख्यमंत्री आणि उपराष्ट्रपती नवीन सभागृहाचे कौतुक करत असताना, दुसरीकडे मात्र नवीन सभागृहात पाणी गळत होते.

महापालिकेची ही इमारत अपूर्ण किंवा निकृष्ट दर्जाची असल्याचे आरोप महापौर मुक्ता टिळक यांनी फेटाळले. गच्चीवर कचरा साठला होता आणो त्यामुळे पाणी साचून पाणी गळाले असल्याचे महापौरांनी सांगितले. अजित पवार यांनी सकाळी पालिकेच्या नवीन इमारतीला भेट दिली होती. त्यावेळी त्यांनी इमारतीच्या उद्घाटनची घाई केल्याचे सांगून इमारतीच्या कामावर नाराजी व्यक्त केली होती.