मुंबई : केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात घटक पक्षांना डावलल्याने शिवसेनेचा चांगलाच तिळपापड झाला होता. त्यातच भाजपने शिवसेनेच्या संतापाकडे दुर्लक्ष करून शिवसेनेला प्रत्युत्तर दिले होते. त्यातच सोमवारी शिवसेना पक्षप्रमुखांनी ‘मातोश्री’वर प्रमुख नेत्यांची तातडीची बैठक बोलावल्याने या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. परंतु, ठाकरे यांनी या बैठकीत संघटनात्मक बांधणीवर उपस्थितांशी चर्चा केली. केंद्रीय मंत्रिमंडळाचा विषय चर्चेत नव्हता, असे सुत्रांनी सांगितले.
सध्यातरी भाजपबरोबरच राहायचे!
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी लगेच दुसर्या दिवशी मातोश्री निवासस्थानी बोलाविलेल्या बैठकीत सध्यातरी भारतीय जनता पक्षाबरोबर राहण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे समजते. केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदलात सेनेला सामावून न घेतल्याने या समारंभावर सेनेने बहिष्कार घातला. त्यावर ठाकरे यांनी मौन पाळले. यानंतर सोमवारी लगेच ठाकरे यांनी पक्षाच्या नेत्यांची व प्रमुख पदाधिकार्यांची बैठक बोलावली होती. संजय राऊत, रामदास कदम, सुभाष देसाई, दिवाकर रावते, गजानन कीर्तिकर यांच्यासह पक्षाचे सर्व महत्त्वाचे नेते तसेच शिवसेनेचे सर्व जिल्हा संपर्कप्रमुख या बैठकीला हजर होते.
…तर सचिवांना आवरा!
आगामी निवडणुकांना सामोरे जाताना संघटना एकसंघ हवी असेल तर शिवसेनेच्या सचिवांना आवरा अशी मागणी या बैठकीत काही शिवसेना नेत्यांनी केली. संपर्क नेते आणि संपर्क प्रमुख यांच्यावर राज्यभरातील अनेक जिल्ह्यांची जबाबदारी असताना त्या जिल्ह्यातील नेमणुका परस्पर सचिवांमार्फत होतात. या नेमणुकांची कल्पनाच त्या संपर्क नेत्यांना नसते. अनेक वेळा जिल्ह्यातील नेते सेना भवनात येतात आणि अनिल देसाई, आदेश बांदेकर आणि विनायक राऊत यांची केबिन कुठे आहे विचारतात? मग आम्ही सेनाभवनात कशासाठी यायचे? असा सवाल शिवसेना नेते पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी केला.
खरे नेते बाजूला पडले
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे संपर्क नेते आणि संबंधित जिल्हाप्रमुखांच्या अहवालाचा विचार करून निर्णय घेत असत. परंतु, आता हे तीन सचिव परस्पर निर्णय घेतात, याबाबतही अनेक नेत्यांनी नाराजी व्यक्त केली. संघटना एकसंघ असेल तर शिवसेना कुणाशीही संघर्ष करण्यास तयार आहे. मात्र ‘मातोश्री’त चमचेगिरी करणार्या सचिवांना महत्त्व आल्यामुळे प्रत्यक्षात तळागाळातील शिवसैनिकांशी संपर्क असणारे नेते बाजूला पडले आहेत, अशाप्रकारची नाराजी या बैठकीत व्यक्त करण्यात आली.