उद्धव ठाकरेंच्या दौर्‍याची उत्सुकता

0

कोल्हापूर । या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे हे कोल्हापूरच्या दौर्‍यावर येणार असून ते आपले नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. यात त्यांची एक जाहीर सभादेखील होणार असल्याचे वृत्त आहे. यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात शिवसेनेचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरे यांच्या होणार्‍या या आगामी दौर्‍याबाबत जनतेत उत्सुकता निर्माण झाली आहे.

असे आहे नियोजन
शिवसेनेच्या शेतकरी संवाद अभियानांतर्गत उद्धव ठाकरे यांचा दौरा विदर्भात व मराठवाड्यात झाला आहे. आता उद्धव ठाकरे या महिन्यात दक्षिण महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत. राज्य सरकारच्या कर्जमाफीला शिवसेनेने विरोध केला असून, राज्यात सत्तेत असूनही शिवसेने सत्ताधारी भाजपाशी संघर्ष करीत आहे. दक्षिण महाराष्ट्रातही शेतकरी संवाद अभियानांतर्गत ते शेतकरी व सेना पदाधिकार्‍यांशी संवाद साधणार आहेत. यासाठी येत्या 24 नोव्हेंबरला कोल्हापूर, 25 नोव्हेंबरला सांगली व 26 नोव्हेंबरला कराड येथे उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा होणार आहे. ठाकरे यांच्या या दौर्‍यावर शिक्कामोर्तब झाले असून, कराडमध्ये सभेच्या ठिकाणाचा शोध स्थानिक सेना पदाधिकार्‍याकडून सुरू झाला आहे.