उद्धव ठाकरेंच्या दौर्‍यासाठी पैसे न दिल्याने मद्य दुकानाची तोडफोड

0

माजी नगरसेवक अशोक नागराणी यांचा आरोप ; शिवसेना शहराध्यक्ष निलेश महाजनविरुद्ध गुन्हा दाखल करणार

भुसावळ- पंढरपूर येथे गत महिन्यात झालेल्या शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या सभेसाठी पैसे न दिल्याने भुसावळ शिवसेना उत्तर विभागाचे शहरप्रमुख निलेश महाजन यांच्या सांगण्यावरून काही महिलांनी मद्य दुकानातील बाटल्यांची तोडफोड करीत आपली कॉलर पकडून शिवीगाळ केल्याचा आरोप माजी नगरसेवक तथा भुसावळ शहर व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष अशोक नागराणी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केला आहे. दरम्यान, निलेश महाजन याच्यासह अन्य महिलांविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल करणार असून उच्च न्यायालयात मानहानीचा दावादेखील दाखल करणार असल्याचे त्यांनी पत्रकाद्वारे कळवले आहे.

पंढरपूरसाठी पैसे न दिल्याने महिलांना केले पुढे
अशोक नागराणी यांनी प्रसिद्धी माध्यमांना दिलेल्या पत्रकानुसार, गत महिन्यात पंढरपूर येथे उद्धव ठाकरे यांच्या सभेसाठी मोठे बंधू रमेश नागराणी यांच्याकडे भुसावळ शिवसेना शहराध्यक्ष निलेश महाजन यांनी पैशांची मागणी केली मात्र ते न दिल्याचा राग आल्याने त्यांनी काही महिलांना पुढे करीत शनिवारी आपल्या वसंत टॉकीजजवळील अशोक वाईन्स या दुकानातील मद्याच्या बाटल्यांची तोडफोड केली तसेच आपली कॉलर पकडूनही शिवीगाळही केल्याचा आरोप नागराणी यांनी केला आहे.

जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाशिवाय दुकान बंद करणार कसे?
शनिवारी शहर बंदची हाक देण्यात आल्याने माझ्यासह सर्व दुकानांसह शहरातील 780 व्यापारी बांधवांनी आपापली दुकाने बंद ठेवली होती तर मद्य दुकान बंद करण्यासाठी जिल्हाधिकारी आदेश देत असल्याने त्या आदेशाशिवाय दुकाने बंद ठेवता येत नाही मात्र 16 रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास शिवसेना आघाडीच्या महिलाप्रमुख पूनम बर्‍हाटे, तालुकाप्रमुख कल्पना कोल्हे, महिला शहरप्रमुख भुराबाई चव्हाण, उत्तर विभाग शहर प्रमुख निलेश महाजन, शहर संघटक योगेश बागुल, पुष्पा खरे, हिराबाई यांच्यासह 15 ते 20 महिला शिवसैनिकांनी आपल्या दुकानात आरडा-ओरड करून अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली. मी दुकान बंद करतो, असे सांगूनही पूनम बर्‍हाटे यांच्यासह अन्य महिलांनी अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली. दुकानातील सामान फेकून आर्थिक नुकसान केल्याचा आरोप नागराणी यांनी केला असून या प्रकाराचे सीसीटीव्ही फुटेज असल्याचे त्यांनी पत्रकात म्हटले आहे.

आरोप खोटे -निलेश महाजन
आपल्यावरील आरोप खोटे असून हा राजकीय स्टंट असल्याचे शिवसेना शहराध्यक्ष निलेश महाजन म्हणाले.

मारहाण, नुकसान केले नाही -समाधान महाजन
तुम्ही पुढारी आहात तर तुम्हाला देशवासीयांचे दुःख कळायला हवे होते. महिलांनी मारहाण वा नुकसान केलेले नाही, असे तालुकाध्यक्ष समाधान महाजन म्हणाले.

गुन्हा दाखल करणार -अशोक नागराणी
निलेश महाजनसह अन्य महिलांविरुद्ध शहर पोलिसात आपण गुन्हा दाखल करणार आहोत शिवाय पंढरपूर दौर्‍यासाठी त्यांनी पैशांची आपल्या मोठ्या भावाकडे मागणी केली होती व पैसे न दिल्याने त्यांनी घडवून आणलेले हे षडयंत्र आहे. संबंधितांविरुद्ध उच्च न्यायालयात अब्रु नुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचे अशोक नागराणी यांनी सांगितले.