उद्धव ठाकरेंच्या पाठीशी उभे राहणे आमचे कर्तव्य: देवेंद्र फडणवीस

0

मुंबई: भारतात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्रात रुग्ण वाढीचा दर हा मोठा असल्याने राज्याची परिस्थिती चिंताजनक आहे. दरम्यान यावर माजी मुख्यमंत्री विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केले आहे.या काळात राजकारण बाजूला ठेवून एकत्र येण्याची आवश्यकता असून आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सोबत आहोत. आजच्या घडीला त्यांना पाठिंबा देणे आमचे कर्तव्य असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. एका वृत्तवाहिनीशी बोलतांना त्यांनी यावर भाष्य केले. मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांच्या कामाचे मूल्यमापन करण्याची ही वेळ नाही असे देखील त्यांनी सांगितले आहे. ‘मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवर बोललो असून त्यांना काही सूचना केले आहे’ असे त्यांनी सांगितले. सध्या कोरोनामुळे राज्यात आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे. मात्र कोरोनासाठी पाहिजे तेवढा खर्च करा, पाहिजे ते आर्थिक निर्णय घ्या, मोठा आर्थिक तुटवडा निर्माण झाला तरी सरकारचे समर्थन करू असे देखील देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. विरोधी पक्ष म्हणून आम्ही या काळात सरकार सोबत असून सरकारला सर्वतोपरी सहकार्य करण्याची आमची तयारी असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.