सोलापूर- माजी महाराष्ट्र केसरी अभिजित कटकेवर विजय मिळवीत महाराष्ट्र केसरी बनलेला बुलडाण्याचा पैलवान बाला रफिकचा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे. उद्धव ठाकरे आज पंढरपूर दौऱ्यावर असून तिथेच सत्कार करण्यात येणार आहे.
लढतीच्या सुरुवातीलाच अभिजितने एक गुणांची कमाई केली होती. आक्रमक सुरुवातीमुळे सामना अटीतटीचा होईल असे वाटले होते. परंतु, नंतर बाला रफिकने ताकदीच्या आणि अनुभवाच्या जोरावर गुणांची वसुली केली. बालारफीने आक्रमक धोरण स्वीकारल्यानंतर अभिजितला पुनरागनाची संधीच लाभली नाही.
बुलडाण्याचा बाला रफिक पुण्यातील हनुमान आखाड्याचा मल्ल आहे. बाला रफिकने उपांत्य फेरीत रत्नागिरीच्या संतोष दोरवडला पराभूत केले. तर अभिजितने सोलापूरच्या रवींद्रला चीतपट केले होते. बाला रफिक शेखने तिसऱ्या प्रयत्नात महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या अंतिम फेरीत स्थान मिळवले होते.
पुण्यातील नव्या दमाच्या २१ वर्षीय अभिजितसमोर बलाढ्य आणि अनुभवी बाला रफिक शेखचे आव्हान होते. त्यामुळे त्याची विजयासाठी कसरत होण्याची शक्यता होती. परंतु, ही लढत एकतर्फीच झाल्याचे दिसून आले. गुणांवर बाला रफिकने अभिजितला पराभूत केले. माती विभागात आतापर्यंत बाला रफिकने तीन वेळा फायनलपर्यंतचा पल्ला गाठला होता. त्यामुळे तो कसलेला मल्ला मानला जातो.