उस्मानाबाद : एअर इंडियाच्या कर्मचार्याला मारहाण करणारे शिवसेनेचे खासदार रवींद्र गायकवाड यांच्यावर सर्व विमान कंपन्यांनी बंदी घातल्यामुळे ते शुक्रवारी ऑगस्ट क्रांती एक्स्प्रेसने मुंबईला यायला निघाले खरे, मात्र, मुंबईला येण्याऐवजी त्यांनी वापीला उतरून उस्मानाबादचा रस्ता धरला. ते मुंबईत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना भेटणार होते. पण ती भेटही कधी होणार, हे अनिश्चित आहे. दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी भेटीसाठी त्यांना वेळ न दिल्याची चर्चा मुंबईत सुरू होती.
याच पार्श्वभूमीवर प्रसिद्धी माध्यमांचा पिच्छा टाळण्यासाठीच खासदार रवींद्र गायकवाड वापीला उतरून उस्मानाबादला निघून गेले, असे सांगण्यात येत आहे. त्यांनी वापी येथे कार मागवून घेतली होती. तसेच त्यांच्यासोबत त्यांचे दोन कार्यकर्तेही होते, असेही सांगण्यात आले. खासदार गायकवाड यांनी दिल्ली ते मुंबई टू टायर एसीची तीन तिकिटे आरक्षित केली होती. त्याआधी मथुरा स्थानकावर ते ट्रेनमधून खाली उतरले होते. सोबतच्या कार्यकर्त्याच्या छातीत दुखू लागल्याने ऑगस्ट क्रांती एक्स्प्रेस काही काळ मथुरा स्थानकावर थांबवण्यात आली होती. तसेच रेल्वेत पत्रकारांशी बोलण्यासही त्यांनी नकार दिला होता.
खासदार गायकवाड यांच्यावर देशातील सर्वच विमान कंपन्यांनी बंदी घातली आहे. पुढील आठवड्यात लोकसभेत या विषयावर चर्चा होण्याची शक्यता आहे. दरम्यान, एअर इंडिया आणि ज्यांना मारहाण झाली ते सुकुमार यांनी केलेल्या तक्रारीच्या आधारे दिल्ली पोलिसांनी कलम 308 व (कलम 355 अन्वये खा. गायकवाड यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून, तपास क्राइम ब्रँचकडे सोपवला आहे.
गायकवाड यांचे लोकसभाध्यक्षांना पत्र
शिवसेना खासदार रवींद्र गायकवाड यांनी लोकसभाध्यक्ष सुमित्रा महाजन व नागरी वाहतूकमंत्री अशोक गजपती राजू यांना पत्र लिहून एअर इंडियाच्या सेवेबद्दल तक्रारी केल्या असून, झाल्या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी पत्रात केली आहे.
एअर इंडियाची देशांतर्गत सेवा अतिशय वाईट असून, कर्मचारीवर्गही अत्यंत उद्धटपणे वागतो, असा आरोपही त्यांनी या पत्राद्वारे केला आहे. वाईट सेवा दिल्यास खासगी कंपन्यांवर कारवाई केली जाते. मग एअर इंडिया कंपनीवर कारवाई का नाही, असा सवालही खासदार गायकवाड यांनी केला आहे.
हवाईसुंदरीने घेतली खासदारांची बाजू
शिवसेनेचे खासदार रवींद्र गायकवाड यांनी केवळ एअर इंडियाच्या कर्मचार्याने केलेल्या गैरवर्तणुकीवर प्रतिक्रिया दिली, असे विधान एअर इंडियाच्या हवाई सुंदरीने केले आहे. ही हवाईसुंदरी त्या वेळी विमानातच उपस्थित होती. रवींद्र गायकवाड हे अतिशय शांतपणे बोलत होते आणि ते चिडतील अशी चिन्हे कुठेच दिसत नव्हती. एअर इंडियाचे कर्मचारी सुकुमार यांना मारण्याचे किंवा त्यांना विमानाच्या शिडीवरून ढकलून देण्याचा रवींद्र गायकवाड यांचा विचार नव्हता, असे त्या हवाईसुंदरीने म्हटले आहे. रवींद्र गायकवाड हे अतिशय सभ्यपणे सर्वांशी बोलत होते. त्यांनी आपला प्रश्न एअर इंडियाच्या कर्मचार्यांना सांगितला आणि आपणास व्यवस्थापक पदावरील व्यक्तिशी बोलायचे आहे, असे म्हटले. गायकवाड यांना बोर्डिंग पासवर जे क्लास चे सीट मिळाले होते. मात्र जागेवर बसताना त्यांना इकोनॉमी क्लासची जागा मिळाली होती.
कारण या मार्गावर केवळ इकोनॉमी क्लासच उपलब्ध असतो, असेही त्या हवाईसुंदरीने म्हटले आहे. आपल्याला एअर इंडियाच्या वरिष्ठ कर्मचार्याला भेटायचे आहे, असे खासदार गायकवाड म्हणाले आणि तिथेच बसून राहिले. त्यानंतर सुकुमार आले आणि ते बोलू लागले. सुकुमार आपले काम प्रामाणिकपणे करत होते. मात्र, अचानकपणे काय झाले कुणास ठाऊक त्यांच्याकडून काही चुकीचे बोलले गेले आणि गायकवाड यांचा पारा चढला. त्यानंतर दोघांमध्ये वाद झाला. दोघेही भांडू लागले होते. त्यानंतर गायकवाड यांनी आपली सँडल काढली आणि त्यांना ते मारणार होते. त्यावेळी मी त्यांच्या भांडणात पडले आणि भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला. रवींद्र गायकवाड यांचे माझ्याशी चांगले वर्तन होते. तसेच ते मला ताई म्हणाले होते. त्यामुळे गायकवाड मला काही करणार नाहीत, अशी खात्री होती. म्हणूनच मी त्यांना आवरण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर ते शांत झाले, अशी माहिती त्या हवाईसुंदरीने एएनआयला दिली आहे.
या प्रकारानंतर एअर इंडिया आणि इतर विमान कंपन्यांनी गायकवाड यांचे तिकीट रद्द केले. त्यामुळे त्यांना झेलम एक्सप्रेसने महाराष्ट्रात परत यावे लागले.