उद्धव ठाकरे-अमित शहा भेटीवर राज यांचे फटकार

0

मुंबई । दोन दिवसांपूर्वीच भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्री येथे जाऊन भेट घेतली. या भेटीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यंगचित्राच्या माध्यमातून खरपूस टीका केली आहे. आगामी निवडणुका एकत्र लढण्याच्या दृष्टीने ही भेट झाली असली, तरी दोघांनीही एकमेकांच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे काम केले आहे, अशी जोरदार टीका या व्यंगचित्रातून राज यांनी केली आहे.

शिवसेना सतत राजीनामे देण्याची भाषा करते. राजीनामे आम्ही खिशात घेऊन फिरतो, अशी वक्तव्ये शिवसेना नेते सतत करत असतात. आता शिवसेना पक्षप्रमुखांनी स्वबळाची भाषा केली आहे. मात्र, त्यानंतर लगेचच अमित शहा यांच्याशी चर्चाही केली. दुसरीकडे भाजपने मन की बात करण्याचा बहाणा करत शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे काम केले आहे, अशा प्रतिक्रिया राजयांच्या या व्यंगचित्रावर व्यक्त केल्या जात आहेत.

दरम्यान, ही भेट दोन्ही पक्षांनी स्वत: च्या स्वार्थासाठी घडवून आणली होती, असा चिमटा व्यंगचित्रातून राज ठाकरे यांनी काढला आहे. यावेळी अमित शहा आणि उद्धव ठाकरे यांची गळाभेट तसेच दोघांच्याही हातात खंजीर दाखवण्यात आला आहे. तर उद्धव ठाकरेंच्या खिशात राजीनामा दिसत आहे.