उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे ‘गजनी’

0

मुंबई । ‘गजनी’ चित्रपटात आमीर खानला विस्मरणाचा आजार जडलेला असतो. त्यावर उपाय म्हणून आमीर खान आपल्या आयुष्यातील विविध घटना, व्यक्ती व प्रसंग शरीरावर गोंदवून ठेवत असतो. उद्धव यांचीही सध्या तशीच अवस्था असल्याचे सांगत आमदार नीतेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांचा उल्लेख महाराष्ट्राचे गजनी असा केला. सत्तेत असूनही उद्धव ठाकरे हे अनेकदा विरोधकांच्या भूमिकेत असतात. वारंवार ते त्यांच्या भूमिका बदलत असतात. त्याचाच धागा पकडून नीतेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टिका केली.

‘गजनी’च्या रुपातील रेखाचित्र केले व्हायरल
उद्धव ठाकरे यांची ’गजनी’शी तुलना करणारे एक रेखाचित्रच नीतेश राणे यांनी ट्विट केले आहे. या चित्रावर त्यांनी शिवसेनेच्या परस्परविरोधी भूमिकांचा उल्लेख केला आहे. त्यात उद्धव यांच्या ‘भाजप आमचा मित्र पक्ष आहे,’ ‘एनडीएच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराला विरोध,’ ‘जीएसटीला विरोध,’ ‘कर्जमाफीला विरोध,’ ‘मी सत्तेत आहे,’ आणि ‘समृद्धीला शिवसेनेचा विरोध आहे,’ या वक्तव्यांचा समावेश आहे. ’महाराष्ट्राचा गजनी’ असा मथळाही या चित्राला देण्यात आल आहे. नीतेश यांचे हे ट्विट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहे.

या आधीही ट्विटरवरून केली टिका
याआधीही नीतेश यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केले होते. राज्यातील सरकारचा पाठिंबा काढून घेण्याचे वक्तव्य विक्रमी वेळा केल्याबद्दल उद्धव यांची गिनीज बुकात नोंद करावी, अशी मागणी त्यांनी केली होती. तसा अर्जच त्यांनी गिनीज वर्ल्ड रेकार्डला केला होता. नुकत्याच झालेल्या मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या शुभारंभाच्या कार्यक्रमात उद्धव ठाकरे व नारायण राणे एकाच व्यासपीठावर आले होते. परस्परांचा आदरपूर्वक नामोल्लेखही केला होता. त्यामुळे राणे-ठाकरे संबंधांतील तणाव निवळेल असे वाटत असतानाच नीतेश यांनी उद्धव यांच्यावर पुन्हा एकदा टीका केली आहे. आता या टीकेला शिवसेना काय उत्तर देते, याबद्दल उत्सुकता आहे.

नितेशकडून शिवसेना टार्गेट
आमदार नितेश राणे यांच्याकडून राजकीय महत्वाकांक्षेपोटी अनेकदा शिवसेनेला लक्ष्य करण्यात आले आहे. प्रत्येक प्रकरणात शिवसेनेला टिका करण्याची संधी ते सोडत नाहीत.