उद्धव ठाकरे यांचा शेतकऱ्यांना दिलासा, कर्जमाफीची घोषणा

0

नागपूर: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज विधासभेमध्ये बोलताना राज्यातील लाखो शेतकऱ्यांना दिलासा देणारी मोठी घोषणा केली. मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांसाठी महात्मा फुले कृषी कर्जमाफी योजना जाहीर केली. या योजनेतंर्गत शेतकऱ्यांचे २ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करण्यात येणार आहे. ३० सप्टेंबर २०१९ पर्यंतचे शेतकऱ्यांचे थकीत कर्ज माफ होणार आहे.

महविकास आघाडी सरकार राज्यात सत्तारुढ झाल्यानंतर शेतकरी कर्जमाफी घोषणेची प्रतिक्षा राज्यातील शेतकऱ्यांना होती. आज विधीमंडळ हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीची घोषणा केली. शेतकऱ्यांच्या खात्यात थेट पैसे जमा होणार आहे. शेतकऱ्यांची ३० सप्टेंबर २०१९ पर्यंतची कर्जे माफ होणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली.

उद्धव ठाकरेंनी कर्जमाफीची योजना जाहीर केली असली तरी, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या घोषणेचा निषेध करुन सभात्याग केला. उद्धव ठाकरे शेतकऱ्याचा सातबारा कोरा करणार असे म्हणाले होते. मग आता दोन लाखापर्यंतच कर्जमाफी का दिली ? असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी विचारला. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री जयंत पाटील यांनी विरोधी पक्ष पहिल्या दिवसापासून फक्त विरोधाची भूमिका घेत आहे. आधीच्या सरकारला शक्य झाले नाही ते आम्ही करुन दाखवलं असं उत्तर दिलं.