उद्यमनगरात तीन ठिकाणी चोर्‍या

0

पिंपरी : येथील उद्यमनगरात असलेल्या सागर अपार्टमेंटमध्ये तीन ठिकाणी चोरी झाली आहे. अज्ञात चोरट्यांनी येथील एका डॉक्टरच्या घरासह अन्य दोन घरांच्या दरवाज्याचा कडी-कोयंडा उचकटून सोने-चांदीचे दागिने, रोख रक्कम चोरून नेली आहे. हा प्रकार शनिवारी उजेडात आला. याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, एकाच अपार्टमेंटमध्ये तीन ठिकाणी चोरी झाल्याने खळबळ उडाली आहे.

चोरट्यांवर गुन्हा दाखल
उद्यमनगरातील सागर अपार्टमेंटमध्ये राहणारे डॉ. मिलिंद मार्तंड शिंदे यांच्या घराच्या दरवाज्याचा कडी-कोयंडा उचकटून चोरट्यांनी घरातील कपाटात ठेवलेले 56 हजार रुपये किंमतीचे सोने-चांदीचे दागिने चोरून नेले. शिंदे यांचे घर बंद असताना चोरट्यांनी ही संधी साधली. शिंदे ज्या अपार्टमेंटमध्ये राहतात; त्याच अपार्टमेंटमध्ये राहणारे संदीप गोयल व श्रीकांत मिरगे यांच्या घरातही चोरी झाली आहे. याप्रकरणी डॉ. मिलिंद शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पिंपरी ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन कडाळे करत आहेत.