नेरुळ : खारघर प्रभाग क्रं. 4 येथील सेक्टर 19 मधील तयार उद्यानात वीजपुरवठा तसेच सोयी सुविधा तत्काळ देण्यात याव्यात. अन्यथा उपोषण करू असा इशारा समाजसेविका बिना गोगरी यांनी दिला आहे. तसे पत्र पनवेल महापालिका व सिडको प्रशासनाला दिली गोगरी यांनी दिली आहे. खारघर मधील सेक्टर 19 अंतर्गत असणार्या भूखंड क्रं. 43 वरील उद्यानात अद्यापही वीजपुरवठा कार्यरत नाही. उद्यानात पाण्याची व्यवस्था अद्यापही नाही. तसेच, बांधून तयार असणारे स्वच्छतागृह खुले करण्यात आलेले नाही. ज्यामुळे, याठिकाणी फेरफटका मारण्यासाठी व खेळण्यासाठी येणार्या ज्येष्ठ नागरिक, महिला व लहान मुलांना स्वच्छतागृहाचा वापर करता येत नाही. वीजपुरवठा उपलब्ध नसल्याने संध्याकाळ नंतर या उद्यानात अंधाराचे साम्राज्य असते. तरी, उद्यानात वीजपुरवठा कार्यरत करून स्थानिक रहिवाश्यांना हक्काची उद्यान व येथील संबंधित सेवा बहाल करावी. अशी मागणी समाजसेविका बिना गोगरी यांनी लेखी निवेदनातून आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांच्याकडे केली आहे.
तोडगा काढण्याचे आयुक्तांकडून आश्वासन
येत्या 15 दिवसांत उद्यानात वीजपुरवठा कार्यरत न केल्यास आपल्या व संबंधित विभागाच्या विरोधात उपोषणाचा मार्ग अवलंबला जाईल. व त्यामुळे उदभवणार्या परिस्थिला आपण व आपला संबंधित विभाग पूर्णतः जबाबदार राहील. अशी चेतावणीही बिना गोगरी यांनी दिली आहे. यावर लवकरात लवकर तोडगा काढण्यात येईल असे आश्वासनही आयुक्त शिंदे यांनी बिना गोगरी यांना दिले आहे. याप्रसंगी जयेश गोगरी अल्पना डे तथा स्थानिक रहिवाशी स्मिता श्रीवास्तव उपस्थित होते.