उद्यानालगत भाजीपाला विक्रेत्यांचे अतिक्रमण

0

मुक्ताईनगर। शहरातील अतिक्रमणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. ग्रामपंचायतीने विशिष्ट सीमारेषेत जागा आखून दिल्यावरही व्यावसायीकांनी थेट वाहतुकीला अडथळा ठरेल, अशा पद्धतीने अतिक्रमण केले आहे. यामुळे होणारे किरकोळ वाद पाहता ग्रामपंचायतीने संबंधितांना नोटीस देत कारवाईचा इशारा दिला आहे. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज उद्यानाच्या संरक्षण भिंतीलगत होणारे अतिक्रमण नेहमीच वादाचा मुद्दा ठरते.

अतिक्रमणामुळे निष्पाप मुलाचा बळी
यावर पर्याय म्हणून ग्रामपंचायतीने व्यावसायीकांना दुकाने लावण्यासाठी सीमारेषा आखून दिली होती. मात्र, बहुतांश व्यावसायिक या सीमारेषेच्या बाहेर रस्त्यावरील वाहतुकीला अडथळा ठरेल, अशा पद्धतीने दुकाने लावतात. याच उतावीळपणामुळे मध्यंतरी एका निष्पाप मुलाचा अपघातामध्ये जीव गेला होता.

दुर्दैवी प्रकार टाळण्यासाठी दिली नोटीस
यानंतर ग्रामपंचायत, सार्वजनिक बांधकाम विभागाने अतिक्रमण काढले होते. मात्र, रोजीरोटीचा विचार करून व्यावसायीकांना दुकाने लावण्यासाठी ठराविक जागादेखील दिली होती. आता याच भाजीपाला, फळ विक्रेत्यांनी हातपाय पसरवून अतिक्रमित जागा वाढवण्यास सुरुवात केली आहे. या वाढत्या अतिक्रमणामुळे या भागात अपघात होऊ शकतो. असा दुर्दैवी प्रकार टाळण्यासाठी ग्रामपंचायतीने अतिक्रमित दुकानदारांना नोटीसद्वारे अल्टिमेटम दिल्याचे सरपंच ललित महाजन यांनी सांगितले.