उद्यान व वृक्षसंवर्धन विभागात सावळा गोंधळ

0

माहिती अधिकारी कार्यकर्ते नितीन यादव यांचा आरोप

पिंपरी-चिंचवड : महापालिका उद्यान व वृक्ष संवर्धन विभागात मोठा सावळा गोंधळ सुरू आहे. उद्यान व वृक्ष संवर्धन विभागाने 2003-04 मध्ये केलेल्या वृक्षगणनेवेळी शहरात 17 लाख 59 हजार 12 झाडे आढळली होती. मात्र, उद्यान अधीक्षक 25 लाख झाडे शहरात असल्याचा दावा करत आहेत. त्यामुळे संभ्रमावस्था निर्माण झाली असून, 2003-04 नंतर वृक्षगणना झालेली नसताना ही आकडेवारी आली कोठून? असा प्रश्न उपस्थित करत उर्वरित साडेसात लाख झाडे चोरीला गेली की काय? असा खोचक सवाल माहिती अधिकार समितीचे अध्यक्ष नितीन यादव यांनी पत्रकार परिषदेत केला. यावेळी आरटीआयचे अशोक कोकणे, राजू डोगीवाल, राजू विश्वकर्मा, सतीश घावरे, श्रीनिवास कुलकर्णी उपस्थित होते.

माहिती देण्यास टाळाटाळ
उद्यानाच्या माती खरेदी, लॉन खरेदी, लहान मुलांची खेळणी खरेदी यासह देखभाल दुरुस्तीत कोट्यवधी रुपयांचा अपहार झाल्याची शक्यता आहे. याविषयी उद्यान विभागातील अधिकारी माहिती देण्यास टाळाटाळ करीत आहेत. वृक्ष गणनेत 2003-04 मध्ये 17 लाख 59 हजार 12 झाडे होती. त्यानंतर उद्यान विभागाने केलेल्या 2012 मधील सर्वेक्षणात 25 लाख झाडे आढळल्याचे उद्यान अधीक्षक तोंडी सांगत आहेत. त्यानुसार सुमारे सात लाख 50 हजार झाडे वाढल्याचे स्पष्ट होत आहे. याबाबत विचारणा केली असता मुख्य उद्यान अधीक्षक व उद्यान विभागाचे अधिकारी उडवाउडवीची उत्तरे देत आहेत. प्रत्येक वर्षी वृक्षगणना करणे अपेक्षित असताना मागील 14 वर्षांत उद्यान विभागाने वृक्षगणना केलेली नाही. त्यामुळे उद्यान विभागातील अधिकार्‍यांची चौकशी करण्याची मागणी यादव यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली आहे.

‘उपग्रहा’द्वारे वृक्षगणनेला विरोधच
महापालिका उद्यान विभागाने उपग्रहाद्वारे वृक्षगणना करण्याचा प्रस्ताव आयुक्तांना सादर केलेला आहे. या वृक्षगणनेसाठी सुमारे सहा कोटी 80 लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. उपग्रहाद्वारे वृक्षगणना करण्यास आमचा विरोध असल्याचेही नितीन यादव यांनी सांगितले. उपग्रहाद्वारे प्रस्तावित असलेल्या वृक्षगणनेत करदात्यांच्या कोट्यवधी रुपयांचा चुराडा होणार आहे. शहरातील वृक्षगणना ही मानवी पद्धतीनेच करायला हवी. त्यावर केवळ 10 ते 15 लाख रुपये खर्च अपेक्षित आहे, असेही त्यांनी सांगितले.