नवी दिल्ली । नागपुरमधील दुसर्या कसोटी सामन्यात श्रीलंकेला चारी मुंड्या चीत केल्यावर भारतीय संघ फिरोझशाह कोटला मैदानात शनीवारपासून सुरू होणार्या तिसर्या आणि शेवटच्या कसोटी सामन्यात आपली विजयाची लय कायम राखण्यासाठी मैदानात उतरेल. या सामन्यातून भारताला सलग नऊ कसोटी मालिका जिंकण्याची संधी मिळाली आहे. हा सामना जिंकल्यास भारतीय संघ ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्या विक्रमाशी बरोबरी करेल. कोलकाता आणि नागपूरमधील खेळपट्ट्याप्रमाणे फिरोझशाह कोटला मैदानाच्या खेळपट्टीवरही गवत राखण्यात आले आहे. इडन गार्डनवर वेगवान गोलंदाजांनी करिष्मा दाखवला होता. तर जमाथाच्या खेळपट्टीवर फिरकी गोलंदाजांनी हुकमत गाजवली होती. त्यामुळे कोलकाता कसोटीप्रमाणे पाच गोलंदाज खेळवायचे की नागपूर कसोटीप्रमाणे चार गोलंदाज खेळवून संघात आणखी एक फलंदाज वाढवायचा असा प्रश्न भारतीय संघव्यवस्थापनाला पडला असेल. या सामन्यात पाच गोलंदाज खेळवण्याचा निर्णय झाल्यास उपकर्णधार अजिंक्य रहाणेला बाहेर बसावे लागण्याची शक्यता आहे. अजिंक्यला तीन डावांमध्ये दुहेरी धावसंख्या उभारता आलेली नाही. रोहीत शर्मा आणि लोकेश राहुलने यशस्वी पुनरागमन केले आहे. कर्णधार विराट कोहली, चेतेश्वर पुजारा, रोहीत शर्मा चांगल्या फार्मात असल्यामुळे भारताची फलंदाजी मजबूत आहे. नागपुरमध्ये फिरकी गोलंदाजांनी यश मिळवले. त्याआधी वेगवान गोलंदाज चमकले होते. पाच गोलंदाज घेऊन खेळण्याचा निर्णय झाल्यास अष्टपैलू विजय शंकर किंवा चायनामन कुलदीप यादवला संधी मिळू शकते. दुसरीकडे पाहुण्या श्रीलंकेच्या संघाला फलंदाजी आणि गोलंदाजीतही मेहनत करावी लागणार आहे. कर्णधार दिनेश चंडीमलचा अपवाद वगळता त्यांच्या एकाही फलंदाजाला 100 चा आकडा पार करता आलेला नाही. दिमुथ करुणारत्ने, लाहिरु थिरीमाने, अँजेलो मॅथ्यूज आणि रंगना हेरथला फलंदाजीत सातत्य ठेवता आलेले नाही. निरोशन डिक्वेला आणि सदीरा समरविक्रमला धावा जोडता आलेल्या नाहीत. गोलंदाजीतही सुरंगा लकमल वगळल्यास इतरांना छाप पाडता आलेली नाही. पाठीच्या दुखापतीमुळे हेरथने माघार घेतली आहे. त्याची अनुपस्थिती पाहुण्यांना जाणवू शकते.
भारतीय संघ कोटला मैदानावर मागील 30 वर्षे एकही कसोटी सामना हरलेला नाही. या काळात भारतीय संघाने खेळलेल्या 11 सामन्यांपैकी 10 सामन्यांचा निकाल यजमानांच्या बाजूने लागला आहे. एक सामना अनिर्णित राहीला आहे, भारताने आतापर्यंत फिरोझशहा कोटलावर 33 सामने खेळले आहे. त्यातील 13 सामने जिंकलेत. सहा सामने भारताने गमावले आणि 14 सामने अनिर्णीत राहिले आहेत. या मैदानावर भारताने नोव्हेंबर 1987 मध्ये वेस्टइंडिजविरुद्धचा सामना गमावला होता. श्रीलंकेने या मैदानावर एकच सामना खेळला आहे. डिसेंबर 2005 मध्ये खेळलेल्या सामन्यात भारताने 188 धावांनी विजय मिळवला होता.
लग 9 मालिका जिंकण्याच्या उंबरठ्यावर
या कसोटी सामन्यातून भारताला ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडच्या सलग नऊ कसोटी मालिका जिंकण्याच्या विक्रमाची बरोबरी करण्याची संधी मिळाली आहे. इंग्लंडने 1884 ते 1892 आणि ऑस्ट्रेलियाने 2005 ते 2008 या काळात ही कामगिरी साधली होती. कोटला मैदानावर भारताने सर्वात मोठा विजय द. आफ्रिकेवर मिळवला आहे. 2015 मध्ये भारताने द.आफ्रिकेला 337 धावांनी हरवले होते. भारताचा या मैदानावर तो शेवटचा सामना होता.