मुंबई : मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी गेल्या अनेक दिवसांपासून आंदोलने होत आहे. दरम्यान सरकारने आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले होते. मात्र अद्यापही मागणीबद्दल सकारात्मक निर्णय झालेला नसल्याने आरक्षणासाठी आक्रमक झालेल्या सकल मराठा क्रांती मोर्चाने सरकारला घेरण्यासाठी विविध आंदोलनांची घोषणा केली आहे. २ नोव्हेंबरला आझाद मैदानात काळ्या फिती आणि काळे झेंडे घेऊन बेमुदत उपोषणाने आंदोलनाला सुरुवात होणार आहे. तर १५ नोव्हेंबरनंतर आदोलनाचे स्वरूप तीव्र होईल असा इशारा देण्यात आला आहे. सकल मराठा क्रांती मोर्चा समन्वय प्रा. संभाजी पाटील यांनी पत्रकार परिषदेत घेत ही माहिती दिली आहे.
मुख्यमंत्र्यांकडून दिशाभूल
मराठा आरक्षणासाठी मुख्यमंत्र्यांनी १५ नोव्हेंबरची मुदत मागितली होती. त्यामुळे आरक्षण प्रश्नावर १५ नोव्हेंबरनंतरच आंदोलनाला सुरुवात होईल. मात्र आरक्षणप्रश्नी पुकारलेल्या महाराष्ट्र बंददरम्यान ज्या मराठा तरुणांवर गुन्हे दाखल झाले आहेत, त्यासह सारथी संस्थेचा कारभार, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ, मराठा विद्यार्थ्यांचे वसतिगृह यांसह विविध मागण्यांवर अद्याप अंमलबजावणी होत नाही. मुख्यमंत्र्यांसह इतर मंत्र्यांकडून यासंदर्भात मराठा समाजाची दिशाभूल होत आहे. छत्रपती संभाजी राजे यांना खासदारकी, नरेंद्र पाटील यांना महामंडळ, सदानंद मोरे यांना सारथी संस्थेचे लाभाचे पद देऊन सरकार आंदोलनात फूट पाडण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र या प्रलोभनांचा समाजावर कोणताही परिणाम होणार नाही. उलट दिवाळीनंतर आंदोलन आक्रमक करण्याचा इशारा प्रा.संभाजी पाटील यांनी दिला आहे.
जनावरे मंत्रालयावर आणि वर्षावर धडकतील
सरकारने उपोषणाची दखल न घेतल्यास १६ नोव्हेंबरपासून सकल मराठा क्रांती मोर्चाचे ग्रामीण भागातील कार्यकर्ते जनावरे घेऊन मंत्रालय आणि मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ या निवासस्थानावर धडकतील. सकल मराठा क्रांती ठोक मोर्चानेही २० नोव्हेंबरपासून आझाद मैदानात बेमुदत उपोषणास बसण्याची घोषणा केली. तर २१ नोव्हेंबरपासून राज्यभरात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला.