उद्यापासून येणार 200 रूपयांची नोट

0

नवी दिल्ली : गणेश चतुर्थीच्या मुहुर्तावर शुक्रवारी गणपती बाप्पांसोबत 200 रुपयांची नोट चलनात येणार आहे. याविषयी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) नोटिफिकेशन जारी केले असून, नोटेचा नमुनाही सार्वजनिक करण्यात आला आहे. दोनशे रूपयांची नोट चलनात आणण्याची ही देशातील पहिलीच वेळ आहे. बुधवारी सरकारने 200 रूपयांची नोट चलनात आणण्याच्या वृत्ताला केवळ दुजोरा दिला होता. तसेच नोट सप्टेंबर महिन्यात चलनात आणली जाईल, असा अंदाज वर्तवण्यात आला होता.

मोठ्या नोटा कमी करणार
आरबीआय बाजारात मोठ्या नोटांऐवजी छोट्या नोटांचा वाटा वाढविण्याच्या तयारीत आहे. त्याचाच एक भाग म्हणून गणेश चतुर्थीच्या गणेश चतुर्थीच्या मुहुर्तावर 200 रुपयांची नोट चलनात आणण्याचा निर्णय घेतला आहे. दोनशे रुपयांच्या नव्या नोटांचे प्रिंटिंग सुरु आहे. सध्या 100 आणि 500 रुपयांच्या नोटांच्या मधील एकही नोट चलनात नाही. त्यामुळे 200 रुपयांची नोट बाजारात आल्यानंतर अल्पावधीतच ती लोकप्रिय ठरू शकते. बाजारात काळ्यापैशांचा व्यवहार 2000 रुपयांच्या नोटांच्या माध्यमातून वाढल्याच्या बातम्या आल्यानंतर आरबीआयने मोठ्या नोटांचा बाजारातील वाटा कमी करण्यास सुरुवात केली आहे. आरबीआय हळूहळू मोठ्या नोटा बाजारातून कमी करून त्याऐवजी छोट्या नोटा बाजारात जास्त आणणार आहे. यासाठी 50 रुपयांचीही नोट पुन्हा आणणार आहे.

अशी असेल नवी नोट
समोरची बाजू
-नोटेवर देवनागरीमध्ये 200 लिहिलेले असेल.
-महात्मा गांधींचा फोटो असेल.
-आरबीआय, भारत आणि 200 हे छोट्या अक्षरात लिहिलेले असेल.
-सिक्युरिटी थ्रेडमध्ये भारत आणि आरबीआय लहिलेले असेल. नोट हलवल्यास तिचा रंग हिरव्या-निळ्या बदलेल.
-महात्मा गांधींच्या छायाचित्राच्या उजव्या बाजूस गॅरंटी क्लॉज, प्रॉमिस क्लॉजबरोबर गव्हर्नरची स्वाक्षरी असेल.
-नोटेच्या खालील बाजूस उजव्या बाजूस रूपयाचे चिन्हासह 200चा आकडा रंग बदलणार्‍या शाईत असेल. त्याचा रंग बदलून हिरवा व निळा दिसेल.
-डाव्या बाजूला वरील बाजूस आणि उजव्या बाजूच्या खालच्या बाजूस छोट्या अंकातून मोठ्या अंकाकडे जाणारा नंबर पॅनल असेल.
-उजव्या बाजूच्या खालच्या बाजूस 200 असे लिहिलेले असेल. ही नोट हलवून पाहिल्यास हिरवा-निळा रंग दिसून येईल.
-उजव्या बाजूस अशोक स्तंभाचे चिन्ह असेल.

मागील बाजूस
-नोटेच्या डाव्या बाजूस छपाईचे वर्ष दिसेल.
-स्वच्छ भारत अभियानाचा लोगो
-विविध भाषांचे पॅनेल
-देवानगरी लिपीत दो सौ रूपये (200) लिहिलेले असेल.
-नोटेचा आकार 66 मिमी रूंद आणि 146 मिमी लांब आहे.