पुणे: देशभरात सुधारित ग्राहक संरक्षण कायदा येत्या उद्या सोमवार २० ऑगस्टपासून लागू होणार आहे. या कायद्यामुळे आता एक कोटी रुपयांपर्यंतची फसवणूक झाल्यास जिल्हा ग्राहक मंचात दाद मागता येणार आहे. यापूर्वी जिल्हा ग्राहक मंचात २० लाख रुपयांपर्यंत फसवणूक झाल्यास जिल्हा ग्राहक मंचात दाद मागता येत होती.
यापूर्वी फसवणूक झाल्यास संबंधित ग्राहक मंचाच्या परिक्षेत्रात दाद मागता येत होती. सुधारित कायद्यानुसार ग्राहकाला आता कोणत्याही जिल्ह्य़ात दावा दाखल करून दाद मागता येणार आहे. जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाकडे बांधकाम व्यावसायिक, विमा कंपनी, रेल्वे, पर्यटन कंपनी, मोबाइल कंपनी, बँका आणि विविध सेवा देणाऱ्या कंपन्यानी सदोष सेवा दिल्यास दाद मागता येत होती.
आता राज्य ग्राहक आयोगाकडे १० कोटी रुपयांपर्यंतच्या फसवणूक प्रकरणात दाद मागता येणार आहे. राज्य ग्राहक आयोगाचे फिरते खंडपीठ पुण्यात आहे. यापूर्वी राज्य आणि राष्ट्रीय आयोगात ३ न्यायाधीशांचा खंडपीठात समावेश असायचा. आता खंडपीठाच्या रचनेत बदल करण्यात आला असून त्यात ५ न्यायाधीशांचा समावेश करण्यात आला आहे. पुण्यातील ग्राहकांना १० कोटी रुपयांपर्यंतची फसवणूक झाल्यास दाद मागणे शक्य होईल. पूर्वी १ कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेची फसवणूक झाल्यास दिल्लीतील राष्ट्रीय ग्राहक आयोगाकडे दाद मागता येत होती. आता १० कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेची फसवणूक झाल्यास दिल्ली येथील राष्ट्रीय ग्राहक आयोगात तक्रार देण्याची तरतूद करण्यात आली आहे.