मुंबई- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उद्या बुधवारी ९ जानेवारी रोजी मराठवाडा दौऱ्यावर आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने हा दौरा महत्वपूर्ण व लक्षवेधी ठरणार आहे. दुष्काळग्रस्त गावांची पाहणी, तेथील शेतकऱ्यांशी संवाद, दुष्काळग्रस्तांना मदत असे उद्धव यांच्या दौऱ्याचे स्वरूप असेल. उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यात शिवसेनेकडून दुष्काळग्रस्तांसाठी मोठी मदत मोहीम राबवली जाणार आहे. या मोहिमेत दुष्काळग्रस्तांना १०० ट्रक पशूखाद्य, धान्य, पिण्यासाठी पाण्याचे टँकर या वस्तूचे वाटप शिवसेनेकडून केले जाणार आहे. युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरेही १२ जानेवारीपासून दुष्काळी भागाच्या पाहणीस जाणार आहेत.
दरम्यान उद्धव ठाकरे राज्यभरात दुष्काळग्रस्त भागांचा दौरा करणार असून उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी सोलापुरातील विविध विकासकामांचे भूमिपूजन व उद्घाटनाच्या निमित्ताने महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत. त्यामुळे उद्या शिवसेना-भाजपात आरोप-प्रत्यारोपाची फैरी झाडणार आहे.