नवी दिल्ली – केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग ४ ते ५ जुलैदरम्यान जम्मू आणि काश्मीरचा दौरा करणार आहेत. या काळात ते अमरनाथला भेट देणार असून ५ जुलैला श्रीनगरमध्ये सुरक्षा आढावा बैठक घेणार आहेत. गेल्या काही दिवसात काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणात दहशतवादी कारवायांमध्ये वाढ झाली आहे. २७ जूनपासून अमरनाथ यात्रेला सुरुवात झाली आहे. बालटाल बेस कॅम्पदरम्यान जोरदार पाऊस झाल्याने ही यात्रा २८ जूनला थांबवण्यात आली होती.
हवामानामध्ये सुधारणा झाल्यानंतर या यात्रेला पुन्हा सुरुवात करण्यात आली आहे. देशभरातील तब्बल २ लाख यात्रेकरुंनी या यात्रेसाठी नोंदणी केली असल्याची माहिती आहे. दहशतवादी कारवाया आणि पाककडून वारंवार होत असलेले शस्त्रसंधीचे उल्लंघन लक्षात घेता सुरक्षा व्यवस्था चोख ठेवण्यात आली आहे. गेल्या वर्षी १० जुलैला अनंतनाग जिल्ह्यामध्ये अमरनाथ यात्रेकरुंच्या बसवर हल्ला झाला होता. या हल्ल्यात ९ ठार तर १९ जण जखमी झाले होते.