कोलकाता-पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी उद्या शनिवारी कोलकातामध्ये विरोधकांच्या भव्य सभेचे आयोजन केले आहे. यावेळी विरोधकांचा सरकारला आपली ताकद दाखवण्याची संधी आहे. भाजपाला आगामी लोकसभा निवडणुकीत हरवण्यासाठी सर्व विरोधक या सभेला हजर राहण्याची शक्यता आहे.
या रॅलीमध्ये सहभागी होण्यासाठी माजी पंतप्रधान आणि जदयूचे प्रमुख एच. डी. दैवेगौडा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार हे कोलकाता येथे पोहोचले आहेत. कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्वामी, द्रमुकचे प्रमुख स्टॅलिन, बसपाचे प्रतिनिधी म्हणून सतीश मिश्रा, राष्ट्रीय लोक दलचे अजित सिंह, माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा आणि अरुण शौरी, पाटीदार नेता हार्दिक पटेल, दलित नेता जिग्नेश मेवाणी आणि झारखंड विकास मोर्चाचे बाबूलाल मरांडी आदींची उपस्थिती असणार आहे.
काँग्रेस राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी या रॅलीत सहभागी होऊ शकणार नाहीत. मात्र, त्यांच्यावतीने मल्लिकार्जुन खर्गे आणि अभिषेक मनु सिंघवी यामध्ये सहभागी होणार आहेत.यासंदर्भात राहुल गांधी यांनी ममता बॅनर्जी यांना पत्र लिहून आपले समर्थन कळवले आहे. अरुणाचल प्रदेशचे माजी मुख्यमंत्री जेगांग अपांग देखील या सभेला हजेरी लावणार आहेत. जेगांग यांनी मंगळवारी भाजपाला सोडचिठ्ठी दिली होती.