पटना : येथील माजी पोलीस महासंचालकांच्या मुलीचे उद्या जिल्हाधिकारी असलेल्या मुलासोबत लग्न होणार होते. मात्र लग्नाच्या एक दिवस अगोदर वधू मुलीने इमारतीवरुन उडी मारुन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज सकाळी घडली आहे. स्निग्धा असे या मुलीचे नाव असून तिचे सोमवारी किशनगंजच्या जिल्हा दंडाधिकाऱ्यासोबत लग्न होणार होते.
माजी महासंचालक सुधांशु कुमार यांची स्निग्धा मुलगी आहे. येथील उदयगिरी अपार्टमेंटमध्ये सुधांशु कुमार राहतात. स्निग्धा सकाळी ड्रायव्हरसोबत अपार्टमेंटमध्ये आली होती. त्यानंतर तिने इमारतीच्या १४ व्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केली. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच जिल्हा दंडाधिकारी आणि वरिष्ठ पोली अधीक्षक घटनास्थळी दाखल झाले आहेत. तसेच, पुढील तपास पोलीस करत आहेत. वरिष्ठ पोलीस अधीक्षक मनु महाराज यांनी सांगितले की, याप्रकरणी तपास सुरु आहे. 14 व्या मजल्यावर मोबाईल सापडला आहे. तसेच, कुटुंबीयांची चौकशी करण्यात येत आहे.