पंढरपूर : आषाढी एकादशी यात्रेनिमित्त महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्रीविठ्ठलाच्या दर्शनाची ओढ लागलेला दहा लाखांपेक्षा अधिक वैष्णोवांचा मेळा पंढरपुरात दाखल झाला आहे. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली, जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या प्रमुख पालख्यांसह शेकडो संतांच्या लहान मोठ्या पालख्या हरिनामाचा गजर करीत पंढरीत अवतरल्या आहेत. आषाढी एकादशीचा सोहळा अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला असताना अवघ्या पंढरीचा परिसर हरिनामाने दुमदुमून गेला आहे. उद्या पहाटे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सपत्नीक पंढरपुरातील श्री विठ्ठल-रखुमाईची महापूजा करणार आहेत.
चंद्रभागेच्या तिरी भक्तीचा महापूर
पालखी सोहळ्यामध्ये सुमारे सहा लाख वारकरी होते. तर पंढरीत एक-दोन दिवस अगोदर चार लाखांपेक्षा वारकरी तथा भाविक दाखल झाले आहेत. टाळ-मृदंगांच्या निनादात सतत होणारा हरिनामाचा गजर आणि प्रत्येकाला विठ्ठल दर्शनाची लागलेली ओढ यामुळे चंद्रभागेच्या तिरी भक्तीचा महापूर आल्याचे विलोभनीय दृश्य पाहावयास मिळाले. पंढरीत दाखल झालेल्या वारकरी तथा भाविकांनी विठ्ठलाच्या दर्शनासाठी लावलेल्या रांगा आजपासून दूरपर्यंत पोहोचत आहेत. दर्शन रांगेत गडबड गोंधळ होऊ नये आणि भाविक वारकर्यांना कोणताही त्रास होऊ नये म्हणून जिल्हा प्रशासनही सजग झालेले आहे.
जिल्हा प्रशासनाची जय्यत तयारी
आषाढी वारीसाठी पंढरपुरात विठ्ठलाच्या दर्शनासाठी राज्यातून तसेच परराज्यातून लाखो भाविक येत असतात. येणार्या वारकरी भाविकांना आवश्यक सोयीसुविधा देण्यासाठी प्रशासनाबरोबरच मंदिर प्रशासनही सज्ज झाले आहे. भाविकांना दर्शन मंडपात शुध्द पिण्याचा पाण्याचा पुरवठा करण्यात येते आहे. भाविकांच्या सुरक्षिततेसाठी मंदिरात व परिसरात सी.सी.टी.व्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. तसेच भाविकांना थेट दर्शनाचा लाभ घेता यावा यासाठी दर्शन मंडप, पत्राशेड, नामदेव पायरी, महाव्दार घाट व सारडा भवन येथे एल.ई.डी स्क्रीन लावल्या आहेत. भाविकांना मार्गदर्शन व माहिती देण्यासाठी विविध ठिकाणी लाऊड स्पिकरही लावण्यात आले आहेत. वारकरी भाविकांना आरोग्यविषयक सोयीसुविधा मिळण्यासाठी आरोग्य विभाग सज्ज असून दर्शन मंडपात उपजिल्हा रुग्णालयाच्या वतीने अतिदक्षता कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे. दर्शन मंडप येथील अतिदक्षता कक्ष 24 तास कार्यरत राहणार असून, कक्षामध्ये तज्ज्ञ डॉक्टर व मदतनीस यांची नियुक्ती केली आहे. तसेच कक्षामध्ये आवश्यक औषधसाठाही उपलब्ध करण्यात आला आहे.
एसटीकडून दिलासा रेल्वेकडून निराशा
आषाढी एकादशीसाठी राज्यभरातून विविध ठिकाणांहून वारकरी बांधव येत आहेत. त्यांची गैरसोय होऊ नये, म्हणून महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने जादा गाड्या सोडल्या आहेत. त्यामुळे बर्यापैकी वारकरी बांधवांची सोय झाली आहे. मात्र रेल्वे प्रशासनाने यंदाच्या वर्षी निराशा केल्याचे चित्र आहे. अमरावती-पंढरपूर ही रेल्वेची विशेष यात्रा फेरी 7 ते 8 तास उशिरा निघाली. त्यामुळे वारकरी बांधवांची प्रचंड गैरसोय झाली.