पुणे-राज्यात उद्या 23 जून पासून प्लास्टिक बंदीची काटेकोर अंमलबजावणी केली जाणार आहे. त्याविरोधात दंडात्मक कारवाई केली जाणार असून एका व्यक्तीकडे पहिल्यांदा पिशवी आढळल्यास पाच हजार, दुसऱ्यांदा पिशवी आढळल्यास दहा हजार, तिसऱ्यांदा पिशवी आढळल्यास २५ हजार रुपये दंड आकारण्याचा निर्णय राज्य सरकारने ठरवला आहे. त्यामुळे आता उद्यापासून कुणाच्याही हातात प्लास्टिकची पिशवी दिसल्यास त्यावर कारवाई होणार आहे. त्याबाबतच्या सूचना राज्यातील सर्व महानगरपालिकांचे आयुक्त, नगरपालिका-नगरपंचायतींचे मुख्य अधिकारी, विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.
पथक नेमण्यात आले आहे
याबाबत घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त सुरेश जगताप म्हणाले, “उद्यापासून प्लास्टिक बंदीचा कडक कारवाई केली जाणार आहे. त्यासाठी आम्ही १५ क्षेत्रिय कार्यालयामध्ये प्रत्येकी एक पथक तयार करण्यात आले आहे. तसेच राज्य सरकारच्या दोन टीम अशा एकूण १७ पथक ही कारवाई करण्यास सज्ज आहे. त्यामध्ये प्रत्येक विभागातील प्लास्टिक विक्रेते आणि वापरकर्त्यांवर दंडात्मक कारवाई केली जाईल. त्याचबरोबर सामान्य नागरिकांनीही प्लास्टिक वापर टाळावा अन्यथा त्यांच्यावरही कारवाई केली जाईल” असे त्यांनी सांगितले.
राज्यात प्लास्टिक बंदीच्या कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करण्यासंदर्भात पर्यावरण विभागाने पावले उचलली आहेत. त्यानुसार ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या व ८ इंच बाय १२ इंच आकारापेक्षा कमी आकाराच्या प्लास्टिक पिशव्यांचे उत्पादन, विक्री आणि वितरणावर बंदी घालण्यात आली आहे. तर पुढील टप्प्यात फ्लेक्स, बॅनर्स, तोरण, इत्यादी वस्तूंचे उत्पादन, वापर, साठवणूक आणि विक्री करण्यावरही बंदी घालण्याचा विचार सुरू आहे. याबाबतचे आदेश पूर्वीच दिले गेले असले तरी परिणामकारक अंमलबजावणी केली जात नसल्याचे आढळून येत आहे. आता उद्यापासून त्याची काटेकोर अंमलबजावणी केली जाण्याची शक्यता आहे.
सध्या तरी चहा कप, सरबत ग्लास, थर्माकोल प्लेट, सजावटीसाठी वापरण्यात येणारे थर्माकोल, हॉटेलमध्ये पार्सल देण्यासाठी वापरण्यात येणारे प्लस्टिक डब्बे, चमचे, पिशवी तसेच उत्पादन ठेवण्यासाठी वापरण्यात येणार प्लास्टिकचा समावेश आहे.