पुणे/मुंबई : भीमा कोरेगावसह सणसवाडी, वढू बुद्रूक, शिरुर परिसरात काल उसळलेल्या हिंसाचाराचे तीव्र पडसाद मंगळवारी राज्यात उमटले. पुणे, पिंपरी-चिंचवड, मुंबई, औरंगाबादसह अनेक शहरात वाहने, बसेस, रेल्वेंवर दगडफेक करण्यात येऊन जाळपोळ करण्यात आली. भारिप-बहुजन महासंघाचे नेते व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी या हिंसाचाराला संभाजी भिडे व मिलिंद एकबोटे यांच्या हिंदुत्ववादी संघटना जबाबदार धरून त्यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी केली आहे. तसेच, या हिंसाचाराच्या निषेधार्थ बुधवारी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. शांततेत हा बंद पाळण्यात यावा, असे आवाहनही त्यांनी केले असून, या राज्यव्यापी बंदमध्ये महाराष्ट्र लोकशाही आघाडी, डावी लोकशाही आघाडी, जातीमुक्त आंदोलन परिषद, एल्गार परिषदेतील अडिचशे संघटनांचे फ्रंट, संभाजी ब्रिगेड आदी संघटनादेखील सहभागी होणार आहेत. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या हिंसाचाराच्या न्यायालयीन चौकशीची घोषणा केली. काल झालेली घटना ही पूर्वनियोजित असल्याचा संशय राज्य सरकारला आहे; त्यामुळे या संपूर्ण घटनेची उच्च न्यायालयातील विद्यमान न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली न्यायालयीन चौकशी केली जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी घोषित केले. मुंबईत ते पत्रकारांशी बोलत होते. याप्रसंगी महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील, सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांचीही उपस्थिती होती. या हिंसाचारप्रकरणी शिव प्रतिष्ठाणचे संभाजी भिडे व हिंदू एकता आघाडीचे मिलिंद एकबोटे यांच्याविरोधात अनिता सावळे यांच्या तक्रारीवरून पिंपरी पोलिस ठाण्यात अॅट्रोसिटी, खुनी हल्ला, दंगल माजविणे, हत्याबंदीचे उल्लंघन करणे आदी गंभीर कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पुढील तपास शिरुर पोलिसांकडे वर्ग करण्यात येणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस अधिकार्यांनी दिली.
मदत करणार्या गावांचे अनुदान बंद करा : आंबेडकर
सोमवारी उसळलेल्या हिंसाचारात पोलिसांनी अक्षम्य हलगर्जीपणा केल्याचा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला असून, या ठिकाणी उसळलेल्या हिंसाचाराची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयात दुपारी दोन वाजेपर्यंत मिळालेली नव्हती, असेही ते म्हणाले. शिव प्रतिष्ठाण आणि हिंदू एकता आघाडी यांनी हा हिंसाचार घडवून आणला असा आरोपही आंबेडकर यांनी केला आहे. हिंदुत्त्ववादी संघटनांनी केलेल्या हिंसाचाराचा निषेध करण्यासाठी बुधवारी शांततापूर्ण महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. हिंदुत्त्ववादी संघटनांना कोरेगाव ते शिरुर आणि कोरेगाव ते चाकण या पट्ट्यातील गावांनी मदत केल्याचा आरोपही त्यांनी केला. तसेच या गावांचे अनुदान पुढील दोन वर्षांसाठी बंद करावे, अशी मागणीही आंबेडकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. विजयस्तंभावर अभिवादन करणार्या अनुयायांचा आणि हिंसाचार करणार्यांचा एकमेकांशी संबंध नव्हता. मात्र आंबेडकरी अनुयायांना यामध्ये लक्ष्य करण्यात आले. तसेच पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणात हलगर्जी केली असे सांगून, आम्ही त्यादिवशी ग्रामीण एसपींना फोन करत होतो; मात्र त्यांचा फोन आऊट ऑफ कव्हरेज एरिया होता. पोलिसांनी या घटनेकडे दुर्लक्ष केले आहे, योग्यवेळी या ठिकाणी कुमक पोहोचली असती तर या घटनेला हिंसक वळण लागले नसते. इमारतींच्या छतावरून दगडफेक करण्यात आली असाही आरोप आंबेडकर यांनी केला.
हिंसाचार पूर्वनियोजित असल्याची शंका : मुख्यमंत्री
भीमा कोरेगाव या ठिकाणी काल झालेल्या हिंसाचाराच्या घटनेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या राजकीय भाष्यानंतर या विषयवार आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही सरकारची भूमिका स्पष्ट केली. काल झालेली घटना ही पूर्वनियोजित असल्याचा संशय राज्य सरकारला आहे, त्यामुळे या संपूर्ण घटनेची उच्च न्यायालयातील विद्यमान न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली न्यायालयीन चौकशी करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. फडणवीस म्हणाले, कोरेगाव भीमा येथे जी घटना झाली त्या घटनेची गंभीर दखल राज्य सरकारने घेतली आहे. मोठ्या प्रमाणात दंगल घडावी अशा प्रकारचाच हा प्रयत्न होता. परंतु, पोलिसांच्या सजगतेमुळे दंगल झाली नाही आणि पोलिसांनी सर्व लोकांना बसेस वगैरे लावून रात्रीपर्यंत त्या ठिकाणहून सुखरूप आपापल्या ठिकाणी योग्य प्रकारे पोहोचवले आहे. त्यामुळे या सर्व घटनेच्या पाठीमागे कोण आहे, किंवा कोण अशी घटना घडविण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करत आहे, याचा छडा लावण्याकरिता उच्च न्यायालयाला विनंती करून विद्यमान न्यायमूर्तींच्या माध्यमातून याची न्यायालयीन चौकशी करण्याचा निर्णय हा राज्य सरकारने घेतला आहे. तसेच या ठिकाणी जी वाहनांची जाळपोळ झाली त्यांना राज्य सरकारच्यावतीने मदत केली जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले.
मृत युवकाच्या परिवाराला दहा लाखांची मदत
संपूर्ण घटनाक्रमानंतर त्या ठिकाणी एका युवकाचा मृतदेहदेखील सापडलेला आहे. आणि तीदेखील अत्यंत गंभीर अशा प्रकारची घटना आहे. ज्या मुलाचा त्या ठिकाणी मृत्यू झाला त्याला हत्या समजून त्याची सीआयडी चौकशी करण्यात येणार आहे. त्याच प्रमाणे हत्या झालेल्या युवकाच्या परिवारालादेखील राज्य सरकारच्यावतीने दहा लाख रुपये देण्यात येतील, असेदेखील मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले. राज्यामध्ये कुठल्याही प्रकारचा जातीय तणाव तयार होऊ नये, अशा प्रकारची विनंती मुख्यमंत्र्यांनी नागरिकांना केली. जो अफवा पसरवण्याचे काम करेल तो कुठल्या विचाराचा आहे, कुठल्या मताचा आहे, कुठल्या जातीचा आहे, कुठल्या धर्माचा आहे याचा विचार न करता पोलिस त्याच्यावर कडक कारवाई करतील, असेही त्यांनी नीक्षून सांगितले. विशेषतः सोशल मीडियातून जर कोणी अफवा पसरवत असेल तर त्याच्यावरदेखील कडक कारवाई केली जाईल, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
वादात राहुल गांधी यांचीही उडी
भीमा कोरेगाव येथे काल झालेल्या हिंसाचारावरून राज्यात सर्वत्र तणावाचे वातावरण असताना, आता या वादात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी उडी घेतली आहे. गांधी यांनी या सर्व घटनेला संघ व भाजपला जबाबदार धरत, ही मंडळी दलितविरोधी असल्याचा आरोप केला. दलितांनी कायम भारतीय समाजाच्या तळाशीच असावे असे संघ आणि भाजपला वाटते, असे राहुल गांधी यांनी आपल्या ट्वीटमध्ये नमूद केले आहे. भाजप व संघ हे फॅसिस्ट मनोवृत्तीचे असून उना, रोहित वेमुला नंतर आता भीमा कोरेगाव हे त्याचेच उदाहरण आहे असा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे.
हिंसाचार पूर्वनियोजत : काँग्रेस, राष्ट्रवादीला संशय
राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनीही भीमा कोरेगाव हिंसाचार हा पूर्वनियोजित कट असल्याचा आरोप केला आहे. या घटनेचा निषेध करतानाच त्यांनी राज्यातील सर्व जनतेला शांतता राखण्याचे आवाहन केले. अशा प्रकारच्या घटना म्हणजे समाजात फूट पाडण्याचा डाव असून, राज्यातील नागरिकांनी त्याला बळी पडू नये, असे आवाहन त्यांनी केले. तसेच, ही घटना अचानक घडलेली नाही तर हा पूर्वनियोजित कट होता असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनीदेखील केला आहे. गेले आठवडाभर त्या परिसरामध्ये काही समाजकंटकांकडून वातावरण तापवण्याचा प्रयत्न होत होता. वडू येथे गोविंद गायकवाड यांची समाधी काहींनी उद्ध्वस्त केली. या प्रकाराची माहिती पोलिसांना होती. पोलिसांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करु नये, असा इशाराही नवाब मलिक दिला.
सणसवाडी, कोरेगाव भीमा येथे घडलेला प्रकार दु:खद आहे. सामाजिक सलोखा राखायला हवा. शांतता राखण्यासाठी सर्वांनी मदत करावी. दरवर्षी तेथे मोठ्या प्रमाणात लोक जात असतात. तिथे जाऊन ते आपली भावना व्यक्त करतात. आजपर्यंत कधीही तिथे स्थानिकांसोबत संघर्ष झालेला नाही. यावेळी 200 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त तिथे मोठ्या संख्येने लोक उपस्थित राहतील, ही कल्पना होतीच. मात्र, सरकारने तेथे पुरेशी खबरदारी घेतल्याचे दिसत नाही. घडलेला प्रकार शोभादायक नाही, यावर पूर्णविराम कसा पडेल यासाठी पावले उचलावीत. राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील लोकांनी यात तेल न टाकता कोणतेही भाष्य करु नये किंवा चर्चा करु नये.
– शरद पवार, ज्येष्ठ नेते