मुंबई-मराठा समाजाला आरक्षण द्यावे, या मागणीसाठी बुधवारी मुंबई, नवी मुंबई आणि ठाण्यात बंदची हाक देण्यात आली आहे. बंददरम्यान तोडफोड आणि हिंसा करु नये, असे आवाहन देखील करण्यात आले आहे.
आज मंगळवारी दुपारी मराठा मोर्चा समन्वयकांची मुंबईत बैठक पार पडली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. विरेंद्र पवार, मुंबई समन्वयक यांनी ही घोषणा केली. उद्याच्या मोर्चात कुठलीही अनुचित घटना घडणार नाही, याची आंदोलकांनी दक्षता घ्यावी, तसेच कुठेही हिंसा करु नये, असे आवाहन संघटनेच्या वतीने करण्यात आले. बुधवारी शाळा, महाविद्यालये सुरु राहतील, तसेच अत्यावश्यक सेवा आणि दूध विक्रेत्यांनही यातून वगळण्यात आले आहे. हा कुठलाही पक्षाचा मोर्चा नसून हा मराठा समाजाचा मोर्चा आहे. राज्य सरकारने तातडीने मेगा भरती थांबवावी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी या बैठकीत करण्यात आली.
परळीतील मराठा समाजातील आंदोलकांची भेट घेण्यासाठी एकही सरकारी अधिकारी किंवा मंत्री पोहोचला नाही, याचाही या बैठकीत निषेध करण्यात आल्याचे समजते.