नवापूर:कोरोनामुळे शासनाने लोकडाऊन घोषित केल्यानंतर जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता इतर सर्व व्यवसाय, दुकाने सुमारे महिन्यापासून बंद आहेत. शिवाय उद्योगधंदे ठप्प झाल्याने अनेकांवर बेरोजगार होण्याची वेळ आली आहे. अनेकांनी कुटुंबाचा प्रपंच चालविण्यासाठी भाजीपाल्यासह फळ विक्रीचा व्यवसाय सुरू केला आहे. ग्रामीण भागातील आदिवासी गाव पाड्यातील ग्रामस्थ शहरात येऊन दारोदारी जावून भाजीपाला व फळांची विक्री करत आहे. त्या माध्यमातून मिळणार्या उत्पन्नातून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहे. पुर्वीचे व्यवसाय बंद करुन अनेक बेरोजगार फळांसह भाजीपाल्याची हातगाड्यांवर विक्री करतांना दिसत असल्याचे चित्र आहे.
*प्रपंच चालविण्याचे मोठे संकट*
लॉकडाऊनच्या काळात हातावर पोट भरणार्यांचे अधिक हाल होत आहे.सलुन, ब्युटी पार्लर, फुलांची दुकाने, पान विक्री, चहा विक्री, पान टपर्या, परीट, ड्रायक्लीनर, हमाल, हॉटेल व्यावसायिक, रिक्षा चालक, गँरेज तसेच विविध दुकानांवर काम करणार्यांच्या हाताला महिनाभरापासून काम नसल्याने प्रपंच चालविण्याचे मोठे संकट उभे राहिले आहे. नवापूर शहरात शनिवारच्या आठवडे बाजारात भाजीपाल्यासह इतर सामानाची शेकडो दुकाने थाटली जातात.छोट्या-मोठ्या व्यवसायातून अनेक जण आपल्या प्रपंचाचा गाढा ओढतात. मात्र, महिनाभरापासून आठवडे बाजारही बंद झाल्याने रोजगार हिरावला गेला आहे. त्यामुळे अनेकांनी आपला मुख्य व्यवसाय सोडून फळे आणि भाजीपाल्याची विक्री सुरू केली आहे. कमी भांडवलात व्यवसाय करता येत असल्याने व जीवनावश्यक बाब म्हणून या बाबीकडे पाहिले जात असल्याने या माध्यमातून बेरोजगारांच्या हाताला काम मिळाले आहे.
ग्रामीण भागातील आदिवासी शेतकरी कोरोनाच्या लाँकडाऊनने हतबल झाला आहे. शहरात रोज मिळेल त्या वाहनाने येऊन शेतीत पिकवलेला भाजीपाला, फळे विक्री करतांना दिसत आहे. आदिवासी महिला गल्लोगल्ली टोपली घेऊन भाजीपाला विक्री करत आहेत. रोज पहाटे उठुन सकाळी 12 वाजेपर्यंत फळे व भाजीपाला विक्री करीत असल्याचे सद्यस्थितीला चित्र आहे.
Next Post