उद्योगनगरीत तलवारी घेवून टोळक्याचा धिंगाणा

0

पिंपरी-चिंचवड : गेल्या आठ दिवसांपासून शहरात गाड्यांच्या तोडफोडीचे सत्र सुरू आहे. सोमवारी रात्री साडेदहा ते अकराच्या दरम्यान मोहनगर येथील रामनगरमधील सैनिक वसाहतीतील परिसरात टोळक्याने सहा गाड्यांची तोडफोड करुन घरांच्या काचाही फोडण्यात आल्या. पिंपरी पोलिसांनी याप्रकरणी दोघांना अटक केली आहे. सलग दुसर्‍या दिवशी शहरामध्ये वाहनांच्या तोडफोडीचे सत्र सुरु असल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे.

संशयीत चिंचवडचे, नऊ जण फरार
सागर दत्तु नलावडे (वय 21, रा. रामनगर), सागर गणेश भिसे (वय 19, रा. दत्तनगर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून विनोद राकेश पवार, पवन विष्णू लष्करे, सुरज गायकवाड, अजय विश्‍वनाथ ओव्हाळ, वैभव ओव्हाळ, सागर सातकर, अभिषेक गाणगाव, निसार शेख, युवराज माने (सर्व राहणार चिंचवड) हे फरार आहेत. याप्रकरणी आण्णासाहेब माधवराव शिरसाट (वय 60 रा. रामंनगर चिंचवड) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

वाहनांचे 23 हजारांचे नुकसान
मोहन नगर परिसरात काल रात्री टोळक्यांनी परिसरात दहशत निर्माण करण्यासाठी सहा वाहनांची तोडफोड केली. या टोळक्याने तलवार, लाठ्या आणि सिमेंटच्या गट्टूच्या सहाय्याने वाहनांची तोडफोड केली.यामध्ये सुमारे दहा ते पंधरा गाड्या फोडल्या असून यामध्ये गाड्यांचे 23 हजार 400 रुपयांचे नुकसान झाले तर फिर्यादीकडील अडीच हजार रुपये या टोळक्याने तलवारीच्या धाकाने काढून घेतले.

महिनाभरापासून गावगुंडांचा धुमाकुळ
यावेळी पत्रकारांशी बोलताना स्थानिकांनी संतप्त भावना व्यक्त केल्या. ही आजचीच घटना नसून दोन दिवसांपूर्वीही परिसरातील तीन गाड्या फोडण्यात आल्या होत्या. तसेच काल त्यांनी हतात तलवारी घेऊन पिरीसरात दहशत पसरवली. त्यांनी खिडक्यांच्या काचा फोडून त्यातून तलवारी घऱात घुसवण्याचा प्रयत्न केला जेणे करुन परिसरात दहशत पसरली आहे. गेल्या महिनाभरापासून अशा घटना रामनगर परिसरात घडत असून जवळच असलेल्या शेतात जुगार व नशा झोपडपट्टीमधील मुले खुले आमपणे करत आहेत.चाट नशेत रात्रभर अशी दहशत पसरवली जाते, अशी तक्रारही नागरिकांनी पोलिसांकडे केली आहे. तसेच परिसरताली दारुचे अड्डे, जुगार यांच्यावर वेळीच निर्बंध आणावेत अशी मागणीही त्यांनी पोलिसांकडे केली आहे.