विदर्भात वीज 10 टक्के स्वस्त, उर्वरित महाराष्ट्राला अच्छे दिन येणार कधी?
पिंपरी चिंचवड : वीजदरवाढ व औद्योगिक ग्राहकांची बंद केलेली पॉवर फॅक्टर पेनल्टी यामुळे वीजबिलात 20 टक्के ते 25 टक्क्यांपेक्षा जास्त वाढ झाली आहे. याचा राज्यातील लघु व मध्यम उद्योगावर मोठ्या प्रमाणावर परिणाम होत आहे. आधीच औद्योगिक मंदीमुळे उद्योजक मेटाकुटीला आला असून, या वीज दरवाढीमुळे तसेच सात टक्के फॅक्टर पेनल्टीमुळे उद्योग दुसर्या राज्यात स्थलांतरित करणे अथवा बंद करणे असे दोनच पर्याय उद्योगापुढे आहेत. याबाबत उद्योगांना अनुकूल असे निर्णय घेण्यात न आल्यास राज्यभर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा पिंपरी-चिंचवड लघुउद्योग संघटनेने दिला आहे. यासंदर्भात, लघुउद्योग संघटनेचे संदीप बेलसरे यांनी माहिती दिली.
पॉवर पेनल्टीबाबत संघटनेेची बैठक…
हे देखील वाचा
मुंबई येथे महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स आणि इंडस्ट्रीजच्या फोर्ट येथील सभागृहात वीज दरवाढ आणि पॉवर फॅक्टर पेनल्टीबाबत चर्चासत्र व पुढील आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष प्रताप होगाडे, पिंपरी-चिंचवड लघुउद्योग संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे, सचिव जयंत कड व महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स आणि इंडस्ट्रीज मुंबईचे संयुक्त सचिव मुकुंद माळी, ठाणे इंडस्ट्रीज असोसिएशनचे अशोक पेंडसे यांच्यासह राज्यभरातील प्रतिनिधी उपस्थित होते.
विदर्भ आणि उर्वरित महाराष्ट्रासाठी भेदभाव…
विदर्भात राज्य सरकारने वीजदरात अनुदान दिले असून, विदर्भ व उर्वरित महाराष्ट्र येथील वीज दरात 10 टक्के फरक आहे. विदर्भात वीज 10 टक्के स्वस्त आहे. त्याठिकाणी वेगळा वीजदर व उर्वरित महाराष्ट्राला वेगळा वीज दर असा भेदभाव सरकारकडून केला जात आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये 15 जानेवारी 2019 च्या आत पिंपरी-चिंचवडमधील सर्व औद्योगिक व्यापारी संघटनांची पिंपरी-चिंचवड लघु उद्योग संघटनेच्या नेतृत्वाखाली समन्वय बैठक घेण्यात येईल. त्यानुसार, 20 ते 31 जानेवारी 2019 या काळात आंदोलन करण्यात येणार असून, त्यासंदर्भात सूचना 31 डिसेंबर 2018 पर्यंत पिंपरी-चिंचवड लघुउदयोग संघटनेच्या 2/3 सदगुरु प्लाझा, थरमॅक्स चौक, चिंचवड येथील कार्यालयात लेखी स्वरुपात आणून द्याव्यात, असे आवाहन संघटेनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे यांनी केले आहे.