उद्योजकांनी नवी मूल्य आत्मसात करून व्यवसायात पारदर्शकता आणणे गरजेचे – रशेश शहा

0

‘मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड अ‍ॅग्रिकल्चर’तर्फे ‘टुवर्डस न्यू इंडिया’वर व्याख्यान

पुणे : उद्योजकांनी नवी मूल्य आत्मसात करणे गरजेचे असून व्यवसायात पारदर्शकता आणणे ही काळाची गरज आहे. उद्योगांनी संबंधित घटकांशी संवाद वाढवणेही आवश्यक आहे. त्याचबरोबर उद्योजकांनी बिनपावत्यांचे व्यवहार, गैरव्यवहार टाळावेत, असे मत अध्यक्ष फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज अर्थात फिक्कीचे अध्यक्ष रशेश शहा यांनी व्यक्त केले. त्याचबरोबर उद्योगजगत आणि सरकार यांच्यातील संवाद आणि परस्पर विश्‍वास वाढणेही आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले.
मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड अ‍ॅग्रिकल्चरच्या (एमसीसीआयए) 84व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ‘टुवर्डस न्यू इंडिया’ या विषयावर ते बोलत होते. या सभेत एमसीसीआयएचे मावळते अध्यक्ष डॉ. प्रमोद चौधरी यांच्याकडून नूतन अध्यक्ष प्रदीप भार्गव यांनी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली. चेंबरचे महासंचालक डॉ. अनंत सरदेशमुख उपस्थित होते.

नव्या संधीचा शोध घ्यावा

भारताचा सध्या सुवर्णकाळ असून भारताकडे अनेक जमेच्या बाजू आहेत. या संधीचा उद्योगजगत कसा फायदा करून घेते, हे महत्त्वाचे आहे. उद्योगांनी, उद्योजकांनी नवी मूल्ये आत्मसात करत आपल्या व्यवसायात अधिकाधिक पारदर्शकता आणण्यासोबतच कर्मचारी, ग्राहक, सरकारी अधिकारी, परिसरातील नागरिकांशी संवाद राखणे आवश्यक आहे. उद्योगांनी नव्या ज्ञानाची निर्मिती, संशोधन, नवतंत्रज्ञानाच्या माध्यमातून नव्या संधीचा शोध घेतला पाहिजे, असेही शहा म्हणाले.

इलेक्ट्रॉनिक क्लस्टरची उभारणी

प्रमोद चौधरी यांनी दोन वर्षातील अध्यक्षपदाच्या काळात केलेल्या कामांचा आढावा घेतला. जीएसटी या महत्त्वपूर्ण स्थित्यंतरातून जाताना उद्योजकांना जीएसटी वॉररूम फायद्याची ठरली. लघु व मध्यम उद्योग अधिक सक्षम व्हावेत यासाठी भोसरी येथील चेंबरच्या स्कील सेंटरच्या माध्यमातून विविध उपक्रम आयोजिण्यात आले. इलेक्ट्रॉनिक क्लस्टरची उभारणीही अंतिम टप्प्यात आहे, असे चौधरी यांनी सांगितले.

समस्यांबाबत पाठपुरावा

अध्यक्षपदाच्या काळात सर्व उद्योगांना भेडसावणार्‍या समस्यांबाबत सरकारकडे पाठपुरावा करून या समस्या सोडविण्याची ग्वाही नूतन अध्यक्ष प्रदीप भार्गव यांनी दिली. त्याचबरोबर उद्योगांनी केवळ नफा कमावण्यावर भर न देता सामाजिक विकास आणि पर्यावरण संवर्धनावरही भर दिला पाहिजे. त्यासाठी चेंबरतर्फे आवश्यक मदत केली जाईल. उद्योजकांसाठी आवश्यक इकोसिस्टिम विकसित करण्यावरही भर दिला जाईल, असे ते म्हणाले.

भारत तिसर्‍या क्रमांकाची अर्थव्यवस्था

भारताची अर्थव्यवस्था वेगाने विकसित होत आहे. सात ते आठ वर्षात जीडीपी दुप्पट होत आहे. 2025 पर्यंत भारत जगातील तिसर्‍या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था होईल. लोकसंख्येचा लाभांश, बचतीचा उत्तम दर, तसेच बँकरप्सी कोड, रेरा आणि जीएसटीसारख्या मूलभूत बदलांमुळे भारतात मोठ्या प्रमाणावर संधी निर्माण झाली आहे.- रशेश शहा, अध्यक्ष, फिक्की

जीएसटीच्या परीक्षेतून बाहेर पडत आहे

भारतीय अर्थव्यवस्था वेगाने वाढत आहे. गेल्या चार तिमाहीत अर्थव्यवस्थेत सातत्याने वाढ दिसून आली आहे. त्यामुळे नोटाबंदी, जीएसटीच्या परीक्षेतून भारतीय उद्योगजगत तावून सुलाखून बाहेर पडत असल्याचे चित्र आहे. जागतिक पातळीवर अस्थिरता कायम राहणार असून त्या तुलनेत भारतीय कंपन्या अधिक सामर्थ्यशाली आहेत. विशेषत: भारतातील लघु व मध्यम उद्योग सध्या अतिशय उत्तम काम करत आहेत, असे शहा यांनी स्पष्ट केले.