भुसावळ। उधना – जळगाव या पश्चिम रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण सुरू आहे. त्या अनुषंगाने डाउन मार्गावरील यार्डाचे रिमोल्डींग केले जात असल्याने रविवार 9 जुलै रोजी सकाळी 4 ते दुपारी 12 वाजे दरम्यान धावणार्या रेल्वे गाड्या प्रभावित होवून त्यांच्या वेळापत्रकात बदल होणार असल्याने या गाड्या उशिराने धावणार आहेत.
यामध्ये गाडी क्रमांक 12656 नवजीवन एक्सप्रेस 1 तास 30 मिनीटे उशिराने धावेल व गाडी क्रमांक 12833 अहमदाबाद हावडा एक्सप्रेस दोन तास विलंबाने धावेल. तर गाडी क्रमांक 59013 भुसावळ – सुरत पॅसेंजर व गाडी क्रमांक 59076 सुरत-भुसावळ पॅसेंजर रविवार रोजी रद्द करण्यात आली आहे. दरम्यान, सुरत पॅसेंजर रद्द झाल्यामुळे येथील चाकरमाने वर्ग तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना याचा त्रास सहन करावा लागणार आहे. उधना ते जळगाव या मार्गाचे रिमोल्डिंगचे काम झाल्यानंतर या मार्गावरील रेल्वे वाहतूक आपल्या नियमित वेळेनुसार सुरळीत केली जाणार आहे.