राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची महापालिकेला सूचना
पुणे : शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी हाती घेण्यात येणार्या उच्च क्षमता वाहतूक वर्तुळाकार मार्ग (एचसीएमटीआर) रस्त्याच्या मूळ आराखड्यात विश्रांतवाडी ते बोपोडी दरम्यानच्या उर्वरित भागाचाही समावेश केला जाणार आहे. यासंदर्भात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय)ने महापालिकेला सूचना केल्या आहेत. महापालिकेने तयार केलेल्या उन्नत रिंगरोडच्या सुमारे 36 किलोमीटरच्या आराखड्यात हा जोड मार्ग नाही. त्यामुळे तो जोडल्यास हा संपूर्ण वर्तुळाकार मार्ग होणार आहे. ही बाब लक्षात घेऊन महापालिकेने हे काम हाती घ्यावे, अशा सूचना करण्यात आल्या आहेत.
वाहनचालकांना फायदेशीर
महापालिकेच्या प्रस्तावित एचसीएमटीआर प्रकल्पाचे सादरीकरण नवी दिल्लीत एनएचएआयच्या तांत्रिक समितीसमोर नुकतेच झाले. यावेळी पालिकेने बोपोडीपासून ते विश्रांतवाडीपर्यंतच्या संपूर्ण उन्नत स्वरुपातील (एलिव्हेटेड) प्रकल्पाचे सादरीकरण केले. या वर्तुळाकार रस्त्याचा मार्ग तुर्तास विश्रांतवाडीपर्यंतच दाखविण्यात आला आहे, पण विश्रांतवाडी- बोपोडी दरम्यानच्या मार्गाची आखणी करून त्याचा समावेश आराखड्यात केला जावा, असे एनएचएआय अधिकार्यांनी पालिकेला सुचविले. हा उर्वरित रस्ताही पूर्ण झाल्यास वाहनचालकांना त्याचा फायदा होणार आहे.
लष्कराची मान्यता आवश्यक
विश्रांतवाडी ते बोपोडीदरम्यानचा उर्वरित मार्ग 4 कि.मी.चा असून त्याचा समावेश एचसीएमटीआरमध्ये झाल्यास संपूर्ण वर्तुळाकार मार्गाची लांबी 40 किमीपर्यंत पोहोचणार आहे. विश्रांतवाडी- बोपोडीदरम्यानचा बहुतांश मार्ग संरक्षण खात्याच्या हद्दीतून जातो. त्यामुळे या ठिकाणी रस्त्याची आखणी आणि त्यानंतर एलिव्हेटेड स्वरुपात त्याचे बांधकाम करण्यासाठी संरक्षण मंत्रालयाच्या मान्यतेची गरज पडणार असल्याचे महापालिका प्रशासनाने म्हटले आहे.