अल्पवयीन मुलीला नोकरीचे अमिष दाखवले
उन्नाव : उत्तर प्रदेशातील उन्नावमध्ये पुन्हा एकदा बलात्काराची घटना घडली आहे. एका अल्पवयीन मुलीला नोकरीचे अमिष दाखवून तीन नराधमांनी हे कृत्य केले. आरोपी हे तिच्या कुटुंबीयांचे जवळचे मित्र होते. आईला खोट्या आरोपात जेलमध्ये पाठवल्यानंतर, आपल्याला नोकरी शोधण्यासाठी मदत देऊ केली होती, असे पीडितेने म्हटले आहे. याप्रकरणी पीडितेच्या वडिलांसह चार जणांवर गुन्हा नोंदवण्यात आला असल्याचे पोलिसांनी सांगितले.
पीडितेला सोडण्यासाठी पैशांची मागणी
खोट्या आरोपावरून माझ्या वडिलांनी माझ्या आईला कारागृहात पाठवले. यानंतर मी पूर्णपणे एकटी पडले आणि नोकरी शोधत होते. यावेळी माझ्या कुटुंबाशी जवळीक असलेल्या माझ्या मित्राने मला नोकरी शोधण्यात मदत करतो, असे सांगितले. यानंतर त्याने मला त्याच्या काकांच्या घरी ठेवले. तेथे त्याने आणि त्याच्या दोन काकांनी बलात्कार केल्याचे पीडितेचे म्हणणे आहे. या नराधमांनी पीडितेला एक दिवस कोंडून ठेवले आणि नंतर तिच्या वडिलांच्या घरी सोडले. मला परत आणण्यासाठी माझ्या वडिलांनी त्यांना दोन लाख रुपये दिले. मी माझ्या वडिलांना सांगत होते, की त्यांनी माझ्यावर बलात्कार केला आहे. मात्र, माझ्या वडिलांनी माझे म्हणणे न ऐकता त्यांना पैसे दिले आणि ते तेथून निघून गेले, असेही पीडितेने म्हटले आहे.